नवी दिल्ली - गेल्या काही काळापासून विराट कोहली आणि रोहित शर्मा भारतीय क्रिकेटमधील दिग्गज फलंदाजांमध्ये सुरू असलेल्या शीतयुद्धाने आता उघड रूप घेतल्याने भारतीय क्रिकेटविश्वामध्ये खळबळ उडाली आहे. दोन्ही खेळाडूंमधील मतभेद तीव्र झाल्याचा दावा केला जात आहे. आता या वादात बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी उडी घेतली असून, सूचक वक्तव्य केले आहे. खेळापेक्षा मोठा कुणीही नाही, असे या वादावरून केंद्रीय क्रीडामंत्र्यांनी सुनावले आहे.
अनुराग ठाकूर म्हणाले की, खेळापेक्षा मोठा कुणी नाही. खेळच सर्वोच्च आहे. कुठल्या खेळाडूमध्ये काय सुरू आहे, याबाबत माहिती मी देऊ शकत नाही. ती संबंधित संघटनेची किंवा संस्थेची जबाबदारी असते. त्यांनी याबाबत माहिती द्यावी, हेच योग्य ठरेल.
जेव्हापासून विराट कोहलीला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आले आहेत, तेव्हापासून वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहेत. टी-२० विश्वचषकामध्ये भारताचा पराभव झाल्यानंतर आधी घोषणा केल्याप्रमाणे विराट कोहलीने कर्णधारपद सोडले होते. मात्र बीसीसीआयने दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी विराट कोहलीला कर्णधार आणि रोहित शर्माला उपकर्णधार म्हणून नियुक्त केले. मात्र बीसीसीआयने एकदिवसीय संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवले होते.
दरम्यान, रोहित शर्माने दुखापतीमुळे कसोटी संघातून माघार घेतली, तेव्हापासून वाद अधिकच चिघळत गेला. मुंबईमध्ये सरावादरम्यान, रोहित शर्माला दुखापत झाली. त्यामुळे त्याला तीन आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानंतर विराट कोहलीही कुटुंबाला वेळ देण्यासाठी एकदिवसीय मालिकेतून माघार घेईल, अशा बातम्या येऊ लागल्या.
विराट कोहली एकदिवसीय मालिकेत खेळणार नाही हे समोर आल्यापासून उलटसुलट प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या. वाढत्या विवादादरम्यान, बीसीसीआयच्या अधिकाऱ्याचे एक विधान समोर आले आहे. त्यानुसार आतापर्यंत विराट कोहलीकडून अधिकृतरीत्या अशी कुठलीही मागणी करण्यात आलेली नाही, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.