नवी दिल्ली : पाकिस्तानच्या यजमानात सध्या आशिया चषकाची स्पर्धा खेळवली जात आहे. पण, सुरक्षेच्या कारणास्तव बीसीसीआयने भारतीय संघाला शेजारील देशात पाठवण्यास नकार दिला. त्यामुळे श्रीलंकेत भारतीय संघाचे सामने खेळवले जात आहेत. आता ही स्पर्धा अंतिम टप्प्यात आली असून रविवारी श्रीलंका आणि भारत यांच्यात फायनलचा सामना होणार आहे. खरं तर भारत आणि पाकिस्तान यांच्यात मागील मोठ्या कालावधीपासून एकही द्विपक्षीय मालिका झाली नाही. दोन्ही देशांमध्ये असलेले तणावपूर्ण संबंध क्रिकेटमध्ये दुरावा निर्माण करत आहेत. खरं तर २०१२-१३ मध्ये शेवटच्या वेळी या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये द्विपक्षीय मालिका झाली होती. तेव्हा पाकिस्तानी संघ भारत दौऱ्यावर आला होता. अशातच भारत सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली असून पाकिस्तानला दहशतवादावरून सुनावले आहे.
केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी माध्यमांशी संवाद साधताना भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मालिकेवर सरकारची भूमिका स्पष्ट केली. "बीसीसीआयने आधीच याबाबत सांगितले आहे. "जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवत नाही तोपर्यंत भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणतेही द्विपक्षीय सामने होणार नाहीत. त्यांची सीमेवरील घुसखोरी, दहशतवादी हल्ले थांबत नाहीत तोपर्यंत दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय मालिका होणार नाही", असे ठाकूर यांनी स्पष्ट केले.
१४ ऑक्टोबरला थरार
आगामी वन डे विश्वचषक भारतात होणार असून स्पर्धेला आता केवळ काही दिवसांचा कालावधी उरला आहे. पाच ऑक्टोबरपासून या बहुचर्चित स्पर्धेला प्रारंभ होणार आहे, तर १४ ऑक्टोबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आमनेसामने असतील. सलामीचा सामना न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे.
Web Title: Union Sports Minister Anurag Thakur has said that the IND vs PAK series will not take place until Pakistan stops terrorism
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.