Unique Hat trick, Merv Hughes: क्रिकेटच्या मैदानात फलंदाज आणि गोलंदाज यांच्यात कमालीची झुंज पाहायला मिळते. कधी फलंदाज तुफान फटकेबाजी करून चाहत्यांना खुश करतो. तर कधी गोलंदाज अप्रतिम मारा करत संघाला विजय मिळवून देत फॅन्सची मनं प्रफुल्लित करतो. सध्या क्रिकेटमध्ये बदलत जाणारा खेळ आणि नियम हे फलंदाजांना साजेसे असल्याचा आरोप अनेक जाणकारांकडून केला जातो. पण त्यातही गोलंदाज आपल्या कौशल्याचा कस लावून आपला ठसा उमटवतात. हॅटट्रिक घेणं ही प्रत्येक गोलंदाजाच्या आयुष्यातील स्वप्नवत गोष्ट असते. अशाच एका अतिशय अजब-गजब हॅटट्रिक बद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. या हॅटट्रिकची विशेष बाब म्हणजे, ही हॅटट्रिक ३ वेगवेगळ्या षटकांत मिळून घेतली गेली.
जर एखाद्या गोलंदाजाने एकाच सामन्यात सलग तीन चेंडूंमध्ये तीन विकेट घेतल्या तरच हॅटट्रिक वैध मानली जाते. अशीच एक भन्नाट हॅटट्रिक आजच्या दिवशी १९८८ साली घेण्यात आली होती. आजपर्यंत, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तीन वेगवेगळ्या षटकांमध्ये मिळून घेतली गेलेली हॅटट्रिक केवळ एकमेव आहे. ती म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या मर्व्ह ह्यूजेसने केलेली कमाल. वेस्ट इंडिजने ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतल्यानंतर ही घटना 5 डिसेंबर १९८८ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या पर्थ कसोटीत घडली होती.
नक्की कशी घेतली ही अजब-गजब हॅटट्रिक?
फलंदाजीला उतरल्यानंतर वेस्ट इंडिज संघाला पहिल्या डावात ४४९ धावांची मोठी मजल मारता आली. कर्णधार सर व्हिव्ह रिचर्ड्सने १५० चेंडूत १४६ धावा करत चौकारांद्वारे तब्बल १०२ धावा फटकावल्या. वेस्ट इंडिजने शेवटच्या पाच विकेट्स २८ धावांत गमावल्या. मर्व्ह ह्युजेसने ५ गडी बाद केले. त्यात त्याने हॅटट्रिकपैकी वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावातील १२२व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर कर्टली अँब्रोसची विकेट घेतली. नंतर त्याने १२४व्या षटकातील पहिल्या चेंडूवर पॅट्रिक पॅटरसनला माघारी पाठवत विंडिजचा डाव संपवला. प्रत्युत्तरात, ऑस्ट्रेलियाने ८ बाद ३९५ वर डाव घोषित करत वेस्ट इंडिजचा पुन्हा मैदानात बोलवले. यावेळी ह्युजेसने नवीन चेंडू घेतला आणि सलामीवीर गॉर्डन ग्रीनिजला डावाच्या पहिल्याच चेंडूवर बाद करत तीन वेगवेगळ्या षटकांमध्ये हॅटट्रिक घेतली. असा कारनाम अद्याप इतर कोणत्याही गोलंदाजाला जमलेला नाही.
दरम्यान, ह्युजेसने या डावात तब्बल आठ गडी बाद केले. शेवटच्या दिवशी सकाळी डाव घोषित करण्यापूर्वी वेस्ट इंडिजने ३४९/९ अशी मजल मारली. विजयासाठी ४०४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ केवळ २३४ धावांत आटोपला आणि वेस्ट इंडिजने १६९ धावांनी सामना जिंकला.