ICC Cricket World Cup League 2 : अमेरिकेच्या क्रिकेट संघाने विन्डहोकच्या युनायटेड क्रिकेट ग्राउंडवर रंगलेल्या सामन्यात युएईच्या गोलंदाजांचा अक्षरश: बुक्का पाडला. भारतीय वंशाचा बॅटर मिलिंद कुमार (Milind Kumar) याने केलेल्या नाबाद १५५ धावा आणि साईतेजा मुक्कामल्ला (Saiteja Mukkamalla) च्या शतकी खेळीच्या जोरावर अमेरिकेच्या संघाने निर्धारित ५० षटकात ४ बाद ३३९ धावा केल्या. या दोघांशिवाय समित पटेल याने ४८ धावांची दमदार खेळी केली.
७४ धावांवर अमेरिकेच्या संघाने गमावल्या होत्या ३ विकेट्स
या सामन्यात युएईच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अमेरिकन संघाच्या धावफलकावर अवघ्या २० धावा असताना सलामीवीर अँड्रिस गॉसला तंबूत धाडत युएईच्या संघाने हा चांगली सुरुवातही केली. अमेरिकन कॅप्टन मोनांक पटेल हा देखील स्वस्तात माघारी फिरला. धावफलकावर ७४ धावा असताना समित पटेल अर्धशतकाच्या उंबरठ्यावर बाद झाला. त्याने ४८ धावा केल्या.
साईतेजा अन् मिलिंद जोडी जमली, तुफान फटकेबाजीसह पाडले गोलंदाजांचे खांदे
आघाडीचे तीन फलंदाज तंबूत परतल्यावर साईतेजा मुक्कामला (Saiteja Mukkamalla) आणि मिलिंद कुमार (Milind Kumar) ही जोडी जमली. दोघांनी मिळून चौथ्या विकेटसाठी १९१ धावांची मजबूत भागीदारी करत युएईच्या संघातील गोलंदाजांचे खांदे पाडले. साईतेजा याने ९९ चेंडूत १४ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १०७ धावांची दमदार खेळी केली. तो तंबूत परतल्यावर मिलींद कुमार याने आपला धडका कायम ठेवला. त्याने ११० चेंडूत १६ चौकार आणि ५ षटकाराच्या मदतीने १५५ धावांची नाबाद खेळी केली.
अमेरिकेच्या संघाने उभारली विक्रमी धावसंख्या
अमेरिकेच्या संघाने वनडे क्रिकेटमध्ये पाचव्यांदा ३०० पेक्षा अधिक धावसंख्या उभारल्याचे पाहायला मिळाले. पण यावेळी हा पराक्रम करताना अमेरिकेच्या संघाने एक खास विक्रम प्रस्थापित केला. वनेडे क्रिकेटमध्ये ४ बाद ३३९ ही अमेरिकन संघाने उभारलेली सर्वोच्च धावसंख्या ठरली.
- ८ जून २०२२ रोजी अमेरिकेच्या संघानं ओमान विरुद्ध पहिल्या डावात ८ बाद ३२३ धावा केल्या होत्या.
- २८ मे २०२२ रोजी स्कॉटलंड विरुद्धच्या सामन्यात पहिल्यांदा बॅटिंग करताना अमेरिकेच्या संघानं निर्धारित ५० षटकात ५ बाद ३१० धावा केल्या होत्या.
- ६ जुलै २०२३ रोजी युएई संघा विरुद्धच्या सामन्यात दुसऱ्या डावात अमेरिकेच्या संघाने ९ बाद ३०७ धावा केल्याचे पाहायला मिळाले होते.
- १३ ऑगस्ट २०२४ रोजी कॅनडा विरुद्धच्या लढतीत अमेरिकेच्या संघाने निर्धारित ५० षटकात ४ बाद ३०४ धावा केल्या होत्या.
Web Title: United Arab Emirates vs United States, 33rd Match Milind Kumar Not Out 155 Saiteja Mukkamalla Century United States 339 for 4 wickets
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.