Chris Gayle, West Indies Champions vs South Africa Champions: टी२० वर्ल्डकपचा थरार नुकताच संपुष्टात आला. यात भारतीय संघाने विश्वविजेतेपद पटकावले. आता वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ चॅम्पियन्स नावाची स्पर्धा रंगली आहे. या स्पर्धेत अनेक जुनेजाणते दिग्गज क्रिकेटपटू सहभागी झाले आहेत. रविवारी या स्पर्धेत युनिव्हर्स बॉस ख्रिस गेला याचा जुना रुद्रावतार पाहायला मिळाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला ख्रिस गेल WCL 2024 मध्ये वेस्ट इंडिज चॅम्पियन्स संघाकडून खेळत आहे. त्याने दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स संघाची तुफान धुलाई करत संघाला विजय मिळवून दिला. आफ्रिकेच्या संघाने दिलेले १७५ धावांचे आव्हान गेलच्या वादळी खेळीपुढे ठेंगणे पडले.
ख्रिस गेलने केला षटकारांचा वर्षाव
विंडीज चॅम्पियन्ससमोर १७५ धावांचे मोठे लक्ष्य होते. पण ख्रिस गेल आणि ड्वेन स्मिथ ही सलामी जोडीने दमदार सुरुवात केली. पहिल्या विकेटसाठी ८.३ षटकांत त्यांनी ६५ धावा केल्या. स्मिथ २२ धावांवर बाद झाला पण ख्रिस गेलने आपला जुना खेळ दाखवून दिला. दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्सच्या गोलंदाजांवर त्याचे यथेच्छ हल्ला चढवला. ख्रिस गेलने अवघ्या ४० चेंडूत ७० धावांची तुफानी खेळी केली. या खेळीत त्याने ४ चौकार आणि तब्बल ६ षटकार खेचले. चॅडविक वॉल्टनने देखील ५६ धावांची खेळी केली. या दोन अर्धशतकवीरांच्या जोरावर वेस्ट इंडिज चॅम्पियन्सने ६ गडी आणि ५ चेंडू राखून विजय मिळवला.
आफ्रिकेकडून एकही अर्धशतक नाही!
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्सने २० षटकांत ५ गडी गमावून १७४ धावा केल्या. अश्वेल प्रिन्स आणि डॅन विलाज यांनी केलेल्या अनुक्रमे ४६ आणि ४४ धावांच्या नाबाद खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेने दीडशेपार मजल मारली. या दोघांच्या शिवाय रिचर्ड लुईसने २० धावांची तर जेपी ड्युमिनीने २३ धावांची खेळी करुन मोलाचा हातभार लावला. वेस्ट इंडिजकडून जेसन मोहम्मदने सर्वाधिक २ बळी टिपले.