किंग्स्टन (जमैका) - युनिव्हर्स बॉस या नावाने प्रसिद्ध झालेल वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल आता क्रिकेटचा निरोप घेण्यासाठी सज्ज झाला आहे. कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात असलेला गेल लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा निरोप घेणार आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये छाप पाडणाऱ्या ख्रिस गेलने टी-२० क्रिकेटमध्ये विशेष दबदबा निर्माण केला. क्रिकेटच्या या वेगवान प्रकारामध्ये १४ हजार धावा आणि २२ शतके फटकावणार गेल हा एकमेव खेळाडू आहे. मात्र नुकत्याच झालेल्या टी-२० विश्वचषकात त्याची कामगिरी तितकीशी चांगली झाली नव्हती. त्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची इच्छा व्यक्त करत घरच्या मैदानावर शेवटचा सामना खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती.
दरम्यान, आता क्रिकेट वेस्ट इंडिजने ख्रिस गेलच्या निरोपाची तयारी केली आहे. क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार १६ जानेवारी रोजी वेस्ट इंडिज आणि आयर्लंड यांच्यातील एकमेव टी-२० सामना हा ख्रिस गेलचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना असू शकतो. आयर्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात ८ ते १६ जानेवारीदरम्यान, तीन एकदिवसीय आणि एकमेव टी-२० सामना जमैकामधील सबिना पार्क येथे खेळवला जाणार आहे.
क्रिकेट वेस्ट इंडिजचे सीईओ जॉनी ग्रेव यांनी गेल्या महिन्यामध्ये सांगितले की, सर्वांना वाटते की, शेवटच्या सामन्यासाठी ख्रिस गेलला घरच्या मैदानावर खेळण्याची संधी दिली गेली पाहिजे. आयर्लंडविरुद्धची मालिका या दृष्टीने चांगला पर्याय ठरू शकते. ख्रिस गेलने टी-२० क्रिकेटमध्ये नाबाद १७५ धावांची खेळी केली होती. तसेच त्याने वेस्ट इंडिजकडून कसोटी क्रिकेटमध्ये दोन त्रिशतकेही फटकावली होती. अनेक दिग्गज खेळाडूंनाही अशी कामगिरी करता आलेली नाही.
गेल्या महिन्यात झालेल्या टी-२० विश्वचषकामध्ये ख्रिस गेलची कामगिरी खूपच खराब झाली होती. तेव्हा पाच सामन्यांमध्ये ९ च्या सरासरीने त्याला केवळ ४५ धावाच जमवता आल्या होत्या. मात्र टी-२० क्रिकेटमधील एकूण विचार केल्यास त्याने २२ शतके आणि ८७ अर्धशतकांच्या मदतीने १४ हजार ३२१ धावा फटकावल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये ३३३ या सर्वोच्च धावसंख्येसह त्याने ७ हजारांहून अधिक धावा काढल्या आहेत. तर ३०१ एकदिवसीय सामन्यांत ३८ च्या सरासरीने १० हजार ४८० धावा फटकावल्या आहे. त्यामध्ये २५ शतके आणि ५४ अर्धशतकांचा समावेश आहे.
Web Title: Universe boss Chris Gayle's Farewell match date, the last match to be played here
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.