नवी दिल्ली : भारताला अंडर-19 विश्वचषक जिंकून देणारा उन्मुक्त चंद आता बांगलादेशमध्ये क्रिकेट खेळणार आहे. लक्षणीय बाब म्हणजे बांगलादेश प्रीमिअर लीगचा (BPL) हिस्सा होणारा चंद हा पहिला भारतीय ठरला आहे. चट्टोग्राम चॅलेंजर्सने बुधवारी 29 वर्षीय उन्मुक्तचा 2023 हंगामासाठी प्लेयर ड्राफ्टमध्ये त्यांच्या संघात समावेश केला आहे.
बांगलादेश प्रीमिअर लीग सर्वोत्तम लीग - चंद दरम्यान, उन्मुक्त चंदने आठवड्यापूर्वी बीपीएल प्लेअर ड्राफ्टसाठी आपले नाव दिले होते. उन्मुक्त सध्या यूएस क्रिकेट सेटअपचा भाग आहे. त्याने बीपीएलला जगातील सर्वोत्तम लीग म्हणून संबोधले आहे. मागील वर्षी तो ऑस्ट्रेलियातील बीग बॅश लीग खेळणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला होता. त्याला पॉइंट टेबलच्या तळाशी असलेल्या मेलबर्न रेनेगेड्स संघाने खरेदी केले होते.
उन्मुक्त चंदच्या नेतृत्वात भारताने जिंकला होता विश्वचषक उन्मुक्त चंदने 2021 मध्ये अमेरिकेत क्रिकेट कारकीर्द सुरू करण्यासाठी भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. उन्मुक्तच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2012 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर अंडर-19 विश्वचषक जिंकला होता. उन्मुक्तने अंतिम सामन्यात शतक झळकावले, ज्यासाठी त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले होते. जगातील सर्वात मोठी टी-20 लीग अर्थात आयपीएलमध्ये उन्मुक्त चंद दिल्ली डेअरडेव्हिल्स, राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स या संघांचा भाग राहिला आहे. उन्मुक्तने टी-20 क्रिकेटमध्ये 1600 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये तीन शतकांचा समावेश आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"