बंगळुरु - इंडियन प्रीमियर लीगच्या 11व्या पर्वातील लिलावाच्या पहिल्या दिवशी सर्व संघमालकांनी युवा खेळाडूंना आपल्या संघात संधी दिली. आज लिलावाचा दुसरा आणि अखेरचा दिवस सुरू असून मुख्यत्वे गोलंदाज हे आजचं आकर्षण ठरणार आहेत. लिलावाचा पहिला दिवस इंग्लंडचा ऑलराऊंडर खेळाडू बेन स्टोक्सच्या नावावर राहिला. त्याच्यावर राजस्थान रॉयल्सने सर्वाधिक साडे बारा कोटींची बोली लावली. गेल्यावर्षीप्रमाणेच यंदाही तो सर्वात महागडा खेळाडू ठरला. भारतीयांपैकी मनीष पांडे आणि के.एल. राहुल यांनी प्रत्येकी 11 कोटी इतक्या रकमेसह हैदराबाद व पंजाब संघात स्थान मिळविले. लिलावातून भारताच्या अनेक तरूण खेळाडूंचं नशीब फळफळलं आणि ते कोट्यधीश झाले. मात्र, यावेळी अनेक दिग्गज खेळाडूंना खरेदीदारच न मिळाल्याने अनेकांच्या कपाळावर आठ्या आल्या. पहिल्या दिवशीच्या लिलावात ख्रिस गेल, लसिथ मलिंगा, ईशांत शर्मा , ज्यो रुट यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंना खरेदीदार मिळाला नाही. पण सर्व संघ मालकांना आज होणा-या लिलावात या खेळाडूंवर बोली लावण्याची अजून एक संधी असणार आहे. त्यामुळे आजतरी या खेळाडूंना कोणी खरेदीदार मिळतो का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
न विकले गेलेले खेळाडू :
जेम्स फॉकनर
जोश हेझलवूड
मिचेल जॉन्सन
मुरली विजय
ख्रिस गेल
जॉनी बेअरस्टो
हाशिम अमला
जो रूट
अॅडम झम्पा
पार्थिव पटेल
सॅम बिलिंग्स
सॅम्युअल बद्री
टिम साऊदी
मिचेल मॅकलेन्घन
लसिथ मलिंगा
पृथ्वी शॉ झाला कोट्यधीश; मुंबईचा वीर खेळणार दिल्लीकडून-
रणजी करंडक स्पर्धा आणि सध्या सुरु असलेल्या अंडर-19 वर्ल्डकपमध्ये दमदार कामगिरी करत असलेल्या मुंबईच्या पृथ्वी शॉ वर आज आयपीएलच्या लिलावात 1 कोटी 20 लाख रुपयांची बोली लागली. दिल्ली डेअरडेव्हिल्सने पृथ्वीला विकत घेतले. अंडर 19 मधला दुसरा खेळाडू शुभम गिलला कोलकाता नाईट रायडर्सने एक कोटी 80 लाखांना विकत घेतले.
एकूण 578 खेळाडूंवर बोली लागणार आहे. यात 244 क्रिकेटपटू कॅप प्लेअर आहेत अन्य 332 खेळाडू अनकॅप कॅटेगरीमध्ये आहेत. कॅप प्लेअर्सची बेस प्राईस 2 कोटी रुपये तर अनकॅप प्लेअरची बेस प्राईस 20 लाख रुपये आहे. पृथ्वी आणि गिल यांची बेसप्राईस 20 लाख रुपये होती. फर्स्ट क्लासच्या 9 सामन्यांमध्ये पृथ्वी शॉ ने 961 धावा फटकावल्या असून यात पाच शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे.
शालेय क्रिकेटपासूनच पृथ्वी शॉ हे नाव चर्चेत असून लवकरच तो भारतीय संघात दाखल होईल असा क्रिकेट पंडितांचा अंदाज आहे. सध्या सुरु असलेल्या अंडर-19 वर्ल्डकप स्पर्धेतही पृथ्वी शॉ ने आपल्या परफॉर्मन्समधून भविष्यातल्या स्टारची चुणूक दाखवून दिली आहे.