Join us  

अनसोल्ड ते मॅचविनर! इंदूरच्या ‘स्टार’ची यशोगाथा

रजत पाटीदार : प्ले ऑफमध्ये पहिला ‘अनकॅप्ड’ शतकवीर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 5:40 AM

Open in App

कोलकाता : इंदूरचा २८ वर्षंचा रजत पाटीदार २०२२ च्या मेगा लिलावात अनसोल्ड राहिला. आधीचा संघ आरसीबीने त्याच्यावर बोली लावली नव्हती. तो मात्र मेहनत करीत होता. लीगच्या मध्येच यष्टिरक्षक- फलंदाज लवनिथ सिसोदिया जखमी होऊन बाहेर पडला अन् रजतचे भाग्य फळफळले.  आरसीबीने बेसप्राईज २० लाखात रजतला रिप्लेसमेंट म्हणून संघात पाचारण केले. त्याच रजतने एलिमिनेटरमध्ये लखनौविरुद्ध  ५४ चेंडूत १२ चौकार आणि सात षटकारांसह नाबाद ११२ धावा कुटल्या. या अनकॅप्ड खेळाडूचे शतक आरसीबीला १४ धावांनी विजय मिळवून देण्यास उपयुक्त ठरले. कोहली आणि डुप्लेसिस सारखे दिग्गज अपयशी ठरल्यानंतर मैदानावर आलेल्या रजतने झंझावात केला. रजत यंदा आयपीएलमध्ये शतक झळकावणारा चौथा फलंदाज ठरला.

सामन्यानंतर रजत म्हणाला,‘  मैदानात उतरल्यानंतर पहिल्या षटकामध्ये चांगली फटकेबाजी करीत मी मोठी खेळी खेळू शकतो, असे वाटू लागले.  पॉवरप्लेमध्ये कृणाल पांड्याच्या षटकामध्ये एक षटकार आणि तीन चौकारांच्या मदतीने २० धावा केल्या. त्यानंतर माझा आत्मविश्वास वाढला.’ लखनौच्या खेळाडूंनी पाटीदारचे दोन ते तीन झेल सोडले. ‘मोठे फटके मारण्याची क्षमता माझ्यात आहे. त्यामुळेच मी  निर्धाव चेंडू खेळायला घाबरलो नाही.  त्यामुळे  मानसिक ताणही येत नाही.  अनसोल्ड राहिल्यानंतर मी खेळावर लक्ष केंद्रित केले होते.’

वडील म्हणाले,‘रजतने कमाल केली !’रजतची खेळी पाहिल्यानंतर त्याचे वडील मनोहर पाटीदार यांची पहिली प्रतिक्रिया होती,‘ माझ्या मुलाने कमाल केली!’ आरसीबीला त्याने यंदा एलिमिनेटरचा अडथळा पार करून दिला. रजत शतक झळकावेल, असे ध्यानीमनी नव्हते. पण, त्याने नाबाद खेळी केली. हे त्याच्या मेहनतीचे फळ आहे.’

रजतने वयाच्या आठव्या वर्षी  बॅट हातात घेतली होती.  वडील मनोहर हे इंदूरच्या महाराणी रोड बाजारात मोटरपंपचे दुकान सांभाळतात. दहा वर्षांचा होताच मोठ्या वयाच्या मुलांसोबत तो मॅच खेळू लागला. मनोहर म्हणाले, ‘शाळेची वेळ वगळता क्रिकेट क्लब ते घर आणि घर ते क्लब अशीच त्याची दिनचर्या असायची. मोजके मित्र होते. बालपणापासून तो शिस्तीत वाढला. क्रिकेटमधील व्यस्त वेळेतच १२ वीपर्यंत पोहोचला. रणजी करंडक आणि अन्य सामन्यांमुळे त्याने १२ वी परीक्षा दिली नव्हती. 

टॅग्स :आयपीएल २०२२रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
Open in App