चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी निवडलेल्या भारतीय संघात शुबमन गिलवर उप कॅप्टन्सीची जबाबदारी देण्यात आलीये. त्याला मिळालेले हे प्रमोशन पाहता बीसीसीआय त्याला रोहित शर्मानंतरचा कॅप्टन्सीचा चेहरा म्हणून पाहत असल्याचे संकेत देणारा आहे. एका बाजूला टीम इंडियात प्रमोशन मिळवून कॅप्टन्सीचा भावी चेहरा म्हणून चर्चेत असलेल्या शुबमन गिलच्या नावे देशांतर्गत क्रिकेटमध्ये लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झालीये. त्याच्या नेतृत्वाखालील पंजाबच्या संघ अवघ्या ५० धावांत ऑल आउट झालाय.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
शुबमन गिलच्या कॅप्टन्सीत पंजाबवर ओढावली नामुष्की
रणजी स्पर्धेत तो पंजाबचं नेतृत्व करतोय. या सामन्यात त्याला बॅटिंगमधील कर्तृत्व सिद्ध करता आले नाहीच याशिवाय त्याच्या कॅप्टन्सीत पंजाबच्या संघावर ५० धावांत ऑल आउट होण्याची नामुष्की ओढावलीये. रणजी क्रिकेटमधील पंजाब संघाची ही दुसरी सर्वात निच्चांकी धावसंख्या आहे. पंजाबचा कॅप्टन शुबमन गिल याने या सामन्यात ८ चेंडूचा सामना करून फक्त ४ धावा केल्या.
पंजाबच्या ताफ्यातून दोघांशिवाय एकालाही गाठता आला नाही दुहेरी आकडा
रणजी ट्रॉफी स्पर्धेतील एलिट ग्रुप सीमध्ये कर्नाटक विरुद्ध पंजाब यांच्यातील सामना बंगळुरुच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. या सामन्यात पहिल्यांदा बॅटिंग करताना शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील पंजाबचा संघ पहिल्या डावात अवघ्या ५० धावांत आटोपला. मध्यफळीतील बॅटर रणदीप सिंग १६ (४५) आणि तळाच्या फलंदाजीतील मयंक मार्कंडे १२ (४२) या दोघांशिवाय पंजाबच्या ताफ्यातील एकालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. कर्नाटक़ संघाकडून वासुकी कौशिक याने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. याशिवाय अभिलाश शेट्टी याने ३ तर प्रसिद्ध कृष्णानं आपल्या खात्यात २ विकेट्स जमा केल्याचे पाहायला मिळाले.
४६ वर्षांनी पंजाब संघावर दुसऱ्यांदा ओढावली ही नामुष्की
रणजी क्रिकेटमध्ये पंजाबच्या संघाची ही आतापर्यंतच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाची निच्चांकी धावसंख्या आहे. याआधी १९७८ मध्ये पंजाबचा संघावर हरयाणाविरद्धच्या सामन्यात ४२ धावांत ऑल आउट होण्याची वेळ आली होती. कर्नाटक विरुद्धच्या सामन्यात पंजाबचा संघ ५० धावांत आटोपला. याशिवाय २०१२ मध्ये मुंबई विरुद्धच्या लढतीत पंजाबचा संघ ५९ धावांत ऑल आउट झाला होता.