IND vs SA 3rd ODI (Marathi News) : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या वन डे मालिकेतील तिसरा व निर्णायक सामना आज खेळवला जातोय. पार्ल येथील सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण, भारतीय संघाकडून रजत पाटीदार व साई सुदर्शन आज सलामीला आले. ऋतुराज गायकवाडला दुखापतीमुळे आजच्या सामन्यातून माघार घ्यावी लागली आहे. पहिल्या दोन वन डे सामन्यात ऋतुराजला फार काही चांगली कामगिरी करता आलेली नव्हती. त्यात त्याला दुसऱ्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली.
ऋतुराज भारताच्या कसोटी संघाचाही सदस्य आहे आणि त्याची दुखापत टीम इंडियाची चिंता वाढवणारी आहे. तो कसोटी संघात खेळेल की नाही अशी शंका उपस्थित झाली आहे. बीसीसीआयने ट्विट केले की, दुसऱ्या वन डे सामन्यात क्षेत्ररक्षण करताना ऋतुराजच्या बोटाला दुखापत झाली आणि त्यातून तो पूर्णपणे सावरलेला नाही. त्यामुळे तो बीसीसीआयच्या वैद्यकिय टीमच्या देखरेखीखाली राहणार आहे.
२६ डिसेंबरपासून पहिल्या कसोटीला सुरुवात होणार आहे. या ५ दिवसात ऋतुराज बरा होण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यात त्याच्या समावेशावर प्रश्नचिन्ह आहे.
भारताचा कसोटी संघ - रोहित शर्मा, शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली. श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, लोकेश राहुल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, केएस भरत