Updates on Indian team (Marathi News) : दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर भारतीय संघ आता घरच्या मैदानावर अफगाणिस्तानविरुद्ध ३ ट्वेंटी-२० आणि इंग्लंडविरुद्ध ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी सज्ज झाला आहे. जूनमध्ये होणारा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप लक्षात घेता भारतीय संघासाठी अफगाणिस्तानची मालिका ही शेवटची आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० मालिका आहे. त्यामुळे या मालिकेसाठी निवडले जाणारे बरेचसे खेळाडू हे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळतील असा अंदाज आहे. रोहित शर्मा व विराट कोहली हे सीनियर वर्ल्ड कप खेळतील का, हा सर्वात मोठा प्रश्न सध्या सतावतोय आणि त्याचे उत्तर आज मिळणार आहे.
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२ पासून रोहित व विराट आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० खेळलेले नाहीत. पण, आता रोहित आणि विराट यांनी बीसीसीआयला ट्वेंटी-२० क्रिकेटसाठी उपलब्ध असल्याचे कळवले आहे. त्यामुळे या दोघांची वापसी होण्याचे संकेत मिळत आहेत. अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी निवड समितीची आज बैठक होणार आहे. या बैठकीत इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी पहिल्या दोन सामन्यांसाठीचा संघही निवडला जाणार आहे. ११ जानेवारीपासून अफगाणिस्तानविरुद्धची मालिका सुरू होत आहे, तर २५ जानेवारीपासून इंग्लंडविरुद्ध पहिली कसोटी सुरू होईल.
दरम्यान, हार्दिक पांड्या व सूर्यकुमार यादव हे अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी उपलब्ध नसणार आहेत, त्यामुळे निवड समिती नवीन कर्णधाराची घोषणा करू शकते. मोहम्मद सिराज व जसप्रीत बुमराह यांनाही विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. हे दोघंही आफ्रिका दौऱ्यावरील कसोटी मालिकेतील सदस्य होते. हे दोन्ही प्रमुख गोलंदाज इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी तंदुरुस्त रहावे अशी निवड समितीची इच्छा आहे.
हायलाईट्स
- रोहित शर्मा व विराट कोहली यांनी ट्वेंटी-२० साठी उपलब्ध असल्याचे बीसीसीआयला कळवले
- अफगाणिस्तानविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी व इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटीसाठी आज संघ निवड
- हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव अजूनही पुर्णपणे फिट नाहीत, जसप्रीत बुमराह व मोहम्मद सिराज यांना विश्रांती मिळण्याची शक्यता
Web Title: Updates on Indian team: Virat Kohli and Rohit Sharma inform BCCI of their eagerness to play T20Is, Hardik & Surya not available for selection
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.