इंडियन प्रीमियर लीग २०२४ (IPL 2024) च्या आधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) रिषभ पंत, मोहम्मद शमी व प्रसिद्ध कृष्णा यांच्या तंदुरुस्तीबाबत मोठे अपडेट्स दिले आहेत. ३० डिसेंबर २०२२ रोजी रुरकी, उत्तराखंडजवळ झालेल्या जीवघेण्या रस्त्याच्या अपघातानंतर क्रिकेटपासून दूर असलेला रिषभ पंत ( Rishabh Pant) आयपीएल २०२४ खेळण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे. १४ महिन्यांच्या पुनर्वसन आणि पुनर्प्राप्ती प्रक्रियेनंतर रिषभ पंतला आता आगामी IPL 2024 मध्ये यष्टीरक्षक फलंदाज म्हणून तंदुरुस्त घोषित करण्यात आले आहे.
वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा याच्यावर २३ फेब्रुवारी २०२४ रोजी डाव्या बाजूच्या क्वाड्रिसेप्स टेंडनवर शस्त्रक्रिया झाली. सध्या बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाकडून त्याच्यावर लक्ष ठेवले जात आहे आणि लवकरच तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पुनर्वसन सुरू करेल. पण, आगामी IPL 2024 मध्ये तो भाग घेऊ शकणार नाही. त्याचवेळी जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीलाही आयपीएल २०२४ मधून माघार घ्यावी लागली. २६ फेब्रुवारी २०२४ रोजी त्याच्या उजव्या टाचेवर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. सध्या त्याच्यावर BCCI वैद्यकीय पथकाकडून देखरेख केली जात आहे.
रिषभ पंत आयपीएल २०२४ मध्ये यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून खेळणार की, फक्त फलंदाज म्हणून ... याचेही उत्तर आता मिळाले आहे. तो यष्टिरक्षण-फलंदाज म्हणून खेळण्यासाठी तंदुरुस्त असल्याचे बीसीसीआयने जाहीर केल्यावर दिल्ली कॅपिटल्सला खूप आनंद झाला आहे.