यंदाच्या क्रिकेट वर्ल्डकपमध्ये सुरुवातीच्या काही सामन्यांनंतर आता धक्कादायक निकाल लागू लागले आहेत. या स्पर्धेत डार्क हॉर्स मानण्यात येत असलेल्या अफगाणिस्तानने थेल विश्वविजेत्या इंग्लंडचाच पराभव करत स्पर्धेत खळबळ उडवून दिली आहे. तर काल नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. दरम्यान हशमतुल्ला शाहिदीच्या नेतृत्वाखालील अफगाणिस्तानच्या संघाने स्पर्धेत मोक्याच्या क्षणी आपली कामगिरी उंचावली आहे. तसेच ही विश्वचषक स्पर्धा भारतात होत असल्याने येथील फिरकी खेळपट्ट्या अफगाणिस्तानच्या फिरकी गोलंदाजांना अनुकूल ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढच्या सामन्यांमध्ये अफगाणिस्तानचा संघ धक्कादायक निकाल नोंदवेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
सध्या अफगाणिस्तानच्या संघ तीन सामन्यांमध्ये एक विजयासह दोन गुणांची कमाई केली आहे. अफगाणिस्तानने विश्वविजेत्या इंग्लंडचा पराभव केला आहे. मात्र तत्पूर्वी झालेल्या लढतीत त्यांना बांगलादेश आणि भारताकडून पराभव पत्करावा लागला होता. आज अफगाणिस्तानचा संघ न्यूझीलंडला आव्हान देत आहे. तर अफगाणिस्तानचे पुढील सामने २३ ऑक्टोबरला पाकिस्तान, ३० ऑक्टोबर रोजी श्रीलंका, ३ नोव्हेंबर रोजी नेदरलँड्स, ७ नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलिया आणि १० नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरोधात होणार आहेत.
सध्याची कामगिरी पाहता अफगाणिस्तानचा संघ नेदरलँड्सविरोधात सहज विजय मिळवू शकतो. उर्वरित चार सामन्यांमध्ये त्यांनी एखाद्या बड्या संघाला पराभूत केले तर, उपांत्य फेरीसाठी सुरू असलेली शर्यंत अधिकच रंगतदार होईल. तसेच त्यामध्ये अफगाणिस्तानलाही संधी असेल.
भारताकडून झालेल्या दारुण पराभवानंतर पाकिस्तानच्या संघाचा आत्मविश्वास खचलेला आहे. तसेच आजारपणांनीही हा संघ त्रस्त आहे. अफगाणिस्तानने आधी पाकिस्तानला पराभूत केलेले आहे. त्यामुळे अफगाणिस्तान पाकिस्तानलाही पराभवाचा धक्का देऊ शकतो. त्याबरोबरच दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे दुबळ्या बनलेल्या आणि कर्णधार दसून शणाकाला झालेल्या दुखापतीमुळे धक्का बसलेल्या श्रीलंकेसाठीही अफणागिस्तानचं आव्हान परतवणं कठीण जाण्याची शक्यता आहे.