क्रिकेटमध्ये पंचांच्या चुकीच्या निर्णयावरुन एखादा संघ किंवा खेळाडू नाराज झाल्याचं आपण अनेकदा पाहिलं आहे. पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळं खेळाडू थेट मैदानात सोडून गेल्याचीही उदाहरणं आहेत. पण एखाद्या संघाच्या खेळाडूंकडून मैदानात केल्या गेलेल्या चुकीच्या वागणुकीमुळं सामन्याचा पंच थेट मैदान सोडून गेल्याचा प्रकार तुम्ही कधी ऐकलाय का? पण हे खरं आहे. क्रिकेट विश्वात आजच्याच दिवशी अशी एक घटना घडली होती.
नेमकं काय घडलं होतं?१८८५ साली आजच्याच दिवशी म्हणजेच २४ मार्च रोजी क्रिकेट विश्वात एक अजब घटना घडली होती. इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा कसोटी सामना २१ मार्च १८८५ रोजी सुरू झाला होता. मेलबर्नच्या स्टेडियमवर कसोटी मालिकेतील अखेरचा सामना खेळवला जात होता. सामन्याच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरू होती आणि संघ अतिशय आक्रमकपणे फलंदाजी करत होता. पण याच दरम्यान पंचांच्या काही निर्णयांवरुन इंग्लंडच्या खेळाडूंनी जाहीर नाराजी व्यक्त केली. इंग्लंडच्या खेळाडूंनी वाईट पद्धतीनं मैदानातच पंचांना डिवचून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. इंग्लंडच्या खेळाडूंकडून वारंवार डिवचलं गेल्यानं पंच जॅक होजेस (jack hodges) खूप निराश झाले आणि त्यांनी चहापानानंतर मैदानात परतण्यास नकार दिला. मग होजेस यांच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाच्याच टॉम गॅरेट यांनी पंचांची जबाबदारी स्वीकारली. दरम्यान, या संपूर्ण प्रकाराचा इंग्लंडच्या संघावर काहीच परिणाम झाला नाही. इंग्लंडनं या सामन्यात ऑस्ट्रेलियावर एक डाव आणि ९८ धावांनी विजय प्राप्त केला होता.
सामन्यात इंग्लंडचा दबदबामेलबर्नवरील सामन्यात ऑस्ट्रेलियानं प्रथम फलंदाजी करत पहिल्या डावात १६३ धावा केल्या. संघात सर्वाधिक ५० धावा ११ क्रमांकाच्या फलंदाजीनं केल्या होत्या. फेड्रिक स्पोफोर्थनं केवळ ७० चेंडूत ४ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर अर्थशतक ठोकलं. तर जॉन टॅम्बलनं नाबाद ३४ धावांचं योगदान दिलं. इंग्लंडच्या जॉर्ज उलयेटनं चार तर बॉबी पील यानं ३ विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडनं पहिल्या डावात ३८६ धावा करत मोठी आघाडी घेतली. कर्णधार ऑर्थर श्रृसबरीनं नाबाद १०५ धावा केल्या तर बिली बर्न्सनं ७४ धावा केल्या. बिली बॅट्सनं ६१ धावांचं योगदान दिलं आणि जॉनी ब्रिग्जनं ४३ धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव १२५ धावांत संपुष्टातऑस्ट्रेलियावर फॉलोऑनचं संकट कोसळलं आणि दुसऱ्या डावात केवळ १२५ धावांमध्ये कांगारुंचा डाव संपुष्टात आला. यात ऑस्ट्रेलियाच्या व्हिलियम ब्रूसनं सर्वाधिक ३५ धावा केल्या. इंग्लंडच्या तीन गोलंदाजांनी प्रत्येकी तीन फलंदाजांना माघारी धाडलं. अखेरीस इंग्लंडचं सामना एक डाव आणि ९८ धावांनी जिंकला.