नवी दिल्ली : टी-20 विश्वचषक खेळण्यासाठी भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रेलियामध्ये असलेल्या विराट कोहलीसोबत एक धक्कादायक घटना घडली. विराटच्या हॉटेल रुममध्ये एक फॅन घुसला आणि रुमसह विराटच्या सामानाचा व्हिडीओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केला. यामुळे संतापलेल्या कोहलीने प्रायव्हसीचा मुद्दा उचलून धरला आहे. यावरूनच आता बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला हिने देखील संताप व्यक्त केला आहे.
उर्वशी रौतेलाने हे संपूर्ण प्रकरण निंदणीय असल्याचे म्हटले आहे. उर्वशीने प्रथम विराटच्या पोस्टवर कमेंट करून तिची नाराजी व्यक्त केली आणि नंतर तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर याचा फोटो शेअर केला. ज्यामध्ये तिने लिहिले की, "नक्कीच, हे खूप वाईट आणि निंदणीय आहे. कल्पना करा की असे कोणी एखाद्या मुलीच्या खोलीत केले तर?". अशा शब्दांत उर्वशीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
विराटने या घटनेचा व्हिडीओ शेअर केला आणि म्हटले, "आपल्या आवडत्या खेळाडूला पाहून चाहते खूश होतात, हे मी समजतो. मी कायमचं याचे कौतुक करत आलोय. परंतु हा व्हिडीओ घाबरवणारा आहे आणि मी माझ्या प्रायव्हसीबाबत चिंतीत आहे. जर मला माझ्या हॉटेलच्या रूममध्ये प्रायव्हसी मिळत नसेल तर पर्सनल स्पेसची मी कुठे अपेक्षा करू. अशा प्रकारच्या गोष्टींशी मी सहमत नाही. लोकांच्या प्रायव्हसीचा सन्मान करा, त्यांना आपल्या मनोरंजनाचे साधन समजू नका," असे विराटने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटले.
यापूर्वीही झाला होता वादटी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ यापूर्वी देखील वादामुळे चर्चेत आला होता. सिडनीमध्ये भारतीय संघाला खाण्यासाठी थंड सँडव्हिच देण्यात आले होते. यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मासह अनेक खेळाडूंनी ते खाण्यास नकार दिला होता. यानंतर मोठा वाद झाला होता आणि आयसीसीलाही स्पष्टीकरण द्यावे लागले होते. आता विराटच्या रुममध्ये फॅन शिरल्याची घटना घटली आहे. त्यामुळे खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"