Join us  

IND vs WI: सूर्यकुमार यादवचं हटके सेलिब्रेशन, राहुल द्रविडला हात जोडून केला प्रणाम; Video पाहून तुम्हीही म्हणाल...लय भारी!

IND vs WI: ३१ चेंडू, ६५ धावा. १ चौकार, तब्बल ७ षटकार अन् स्ट्राइक रेट २०९ हून अधिक! हा आकडा आहे सूर्यकुमार यादवनं काल कोलकाताच्या इडन गार्डनवर केलेल्या तुफानी खेळीचा.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 12:44 PM

Open in App

IND vs WI: ३१ चेंडू, ६५ धावा. १ चौकार, तब्बल ७ षटकार अन् स्ट्राइक रेट २०९ हून अधिक! हा आकडा आहे सूर्यकुमार यादवनं काल कोलकाताच्या इडन गार्डनवर केलेल्या तुफानी खेळीचा. सूर्यकुमार यादवनं भारतीय संघ कठीण परिस्थित असताना दमदार फलंदाजी करत व्यंकटेश अय्यरसोबत अवघ्या ३७ चेंडूत ९१ धावांची भागीदारी रचली. तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारतीय संघाचे १५ षटकांच्या अखेरीस अवघ्या ९८ धावा झाल्या होत्या. पण पुढच्या पाच षटकांच्या अखेरीस भारतीय ५ विकेट्सच्या मोबदल्यात १८४ धावांपर्यंत पोहोचला. अय्यर आणि सूर्यकुमार यादव यांनी मिळून शेवटच्या ३० चेंडूंमध्ये तब्बल ८६ धावा कुटल्या. या खणखणीत भागीदारीनंतर वेस्ट इंडिजचा पराभव निश्चित झाला आणि भारतीय संघानं ट्वेन्टी-२० मालिकेतही विंडीजला क्लीन स्वीप दिला. सूर्यकुमार यादवनं यावेळी त्याचं अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर केलेलं सेलिब्रेशन सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. यात सूर्यकुमारनं भारतीय संघाच्या डगआऊटकडे पाहून दोन्ही हात जोडून नमस्कार करताना पाहायला मिळत आहे. 

सूर्यकुमार यादवनं अवघ्या २७ चेंडूत अर्धशतक साजरं केलं आणि त्यानंतर भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूनं सूर्यकुमारचं डगआऊटमधून कौतुक केलं. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडही उभं राहून टाळ्या वाजवत सूर्यकुमारला प्रोत्साहन दिलं. त्यानंतर सूर्यकुमार यादवनं दोन्ही हात जोडून प्रणाम केला आणि द्रविडची शाबसकी विनम्रपणे स्वीकारली. सूर्यकुमारचा हाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून त्यावर चाहते सूर्यकुमारचं कौतुक करत आहेत. 

पाहा व्हिडिओ-

सामनावीरासह मालिकावीराचा पुरस्कारसूर्यकुमार यादवला वेस्ट इंडिज सीरीज विरुद्धच्या मालिकेचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडण्यात आलं. सूर्यकुमारनं ३ सामन्यांत ५३ हून अधिकच्या सरासरीनं १०७ धावा केल्या आणि स्ट्राइक रेट तब्बल २०० इतका होता. तसंच सूर्यकुमार यादवला ट्वेन्टी-२० सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार देखील देण्यात आला. भारतीय संघाच्या मधळ्या फळीचा एक भक्कम वासा असल्याचं सूर्यकुमार यादवनं सिद्ध करुन दाखवलं आहे. 

टॅग्स :सूर्यकुमार अशोक यादवराहुल द्रविडभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबीसीसीआयरोहित शर्मा
Open in App