हिसार : मागच्या वर्षी इन्स्टाग्राम चॅटदरम्यान युजवेंद्र चहलविरूद्ध कथित जातिवाचक आक्षेपार्ह शब्दांचा वापर केल्याप्रकरणी माजी दिग्गज खेळाडू युवराज सिंगवर हरियाणा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एका अधिकाऱ्याने सोमवारी ही माहिती दिली. लॉकडाऊनमध्ये रोहित शर्मासोबत लाइव्ह चॅटदरम्यान युवराज सिंगने युजवेंद्रबाबत जातिवाचक आक्षेपार्ह शब्द उच्चारला. याविषयी सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर वाद झाला होता. ३९ वर्षांच्या युवीने नंतर माफी मागताना ‘मी अनावधानाने सार्वजनिक भावना दुखावल्या’ असे स्पष्टीकरणही दिले होते. हांसीच्या पोलीस अधीक्षक निकिता गहलोत यांनी दिलेल्या माहितीनुसार,‘दलित समाजातील मानवाधिकार कार्यकर्ते अॅडव्होकेट रजत कलसन यांनी युवराज विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. युवराजविरोधात कलम १५३ (चिथावणी देणे ), १५३ अ (जाती किंवा धर्माबद्दल तेढ निर्माण करणे ), २९५, ५०५ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
काय आहे प्रकरण...लाईव्ह कार्यक्रमात युवीने युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांना ‘भंगी’ असं संबोधलं होते. युवराजच्या या शब्दावरून अनेक युजर्सनी युवीवर टीका केली. ‘ रोहितने लॉकडाऊनदरम्यान सर्वजण निवांत असून चहल, कुलदीपही ऑनलाईन आले आहेत,’ असे सांगताच त्यावर बोलताना युवराजने मस्करीत चहलबद्दल आक्षेपार्ह शब्द उच्चारला. त्यावर रोहितनेही हसत हसत तो विषय सोडून दिला होता.