ICC Awards: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) मागील काही दिवसांपासून २०२३ मधील सर्वोत्कृष्ट खेळाडूंना पुरस्काराने सन्मानित करत आहे. अशातच गुरूवारी 'टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर'ची घोषणा करण्यात आली. २०२३ या वर्षात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा (WTC) अंतिम सामना खेळवला गेला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या अंतिम लढतीत भारताचा दारूण पराभव झाला. भारताला सलग दुसऱ्यांदा या पर्वाच्या फायनलमध्ये पराभव स्वीकारावा लागला. पॅट कमिन्सच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलियाने प्रथमच अजिंक्य होण्याचा मान पटकावला. या आधी पदार्पणाच्या पर्वात न्यूझीलंडने भारताला नमवून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा जिंकली होती. खरं तर ICC पुरूष क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सच्या नावाची घोषणा झाली आहे.
कमिन्सला ICC पुरुष क्रिकेटपटू ऑफ द इयर २०२३ साठी सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफीचा विजेता म्हणून घोषित करण्यात आले. तर, २०२३ चा सर्वोत्कृष्ट कसोटी खेळाडू म्हणून उस्मान ख्वाजाची निवड करण्यात आली आहे. त्याने मागील वर्षी कसोटी फॉरमॅटमध्ये १००० हून अधिक धावा केल्या आहेत, असे करणारा तो एकमेव खेळाडू आहे. आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार, उस्मान ख्वाजाने या शर्यतीत ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड, भारताचा रविचंद्रन अश्विन आणि इंग्लंडचा जो रूट यांना मागे टाकले. उस्मान ख्वाजाच्या अप्रतिम फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने आपला दबदबा कायम ठेवला आणि चॅम्पियन होण्याचा मान पटकावला.
कांगारूंच्या खेळाडूंचा ICC कडून सन्मान
२०२३ या वर्षात उस्मान ख्वाजाने एकूण १३ कसोटी सामने खेळले, ज्यामध्ये त्याने १२१० धावा केल्या. उस्मान ख्वाजाची सरासरी ५२.६० राहिली. ३ शतके आणि ६ अर्धशतकी खेळींच्या जोरावर त्याने ही किमया साधली. ख्वाजा मागील वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. त्याच्या पाठोपाठ त्याचा सहकारी स्टीव्ह स्मिथचा नंबर लागतो, ज्याने १३ सामन्यात ९२९ धावा केल्या. भारताकडून २०२३ मध्ये कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या विराट कोहलीच्या नावावर ६७१ धावांची नोंद आहे.
दरम्यान, उस्मान ख्वाजाला २०२३ हे वर्ष विविध कारणांमुळे आठवणीत राहील. कारण मागील वर्षी तो अनेक नाट्यमय घडामोडींमुळे चर्चेत राहिला. इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धाबाबत उस्मान ख्वाजा सातत्याने त्याचे मत मांडत राहिला. अनेकदा त्याने मैदानावर पॅलेस्टाईनला उघडपणे पाठिंबा देण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे त्याला आयसीसीच्या विरोधात देखील जावे लागले. उस्मान ख्वाजाने आयसीसीकडे पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ स्टिकर्स लावण्यासाठी परवानगी मागितली होती. पण ICC ने नकार दिल्यानंतर तो उघडपणे ICC च्या विरोधात आला. मात्र, ICC ने उस्मान ख्वाजाला वर्षातील सर्वोत्तम कसोटीपटूचा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
Web Title: Usman Khawaja has been selected as ICC Men's Test Cricketer of the Year while Australia captain Pat Cummins has been selected for Cricketer Of The Year 2023
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.