नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाला १९८३ मध्ये आपल्या नेतृत्वात पहिला विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार कपिल देव यांनी विराट कोहलीबाबत मोठं वक्तव्य केलं. कपिल यांच्या या वक्तव्याने खूप मोठा वाद ओढवला असून हा वाद चिघळण्याची शक्यता आहे. कपिल देव यांनी केलेल्या विधानाला कर्णधार रोहित शर्माने उत्तर दिले. रोहितने आपला सहकारी विराट कोहलीची पाठराखण केली. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियाचा फलंदाज उस्मान ख्वाजाने याने विराटची बाजू घेत कपिल देव यांची खिल्ली उडवली आहे.
कपिल देव यांनी म्हटले होते की विराटचा सध्याचा फॉर्म पाहता आता त्याला संघातून बाहेर बसवून त्या जागी एखाद्या चांगल्या लयीत असलेल्या युवा खेळाडूला संधी दिली तर जास्त चांगले होईल. कपिल देव यांच्या या विधानाला ऑस्ट्रेलियाच्या उस्मान ख्वाजाने झकास उत्तर दिले आहे. कपिल जर तसं म्हणत असतील तर ऑस्ट्रेलियाला काही हरकत नाही, तुम्ही विराटला खुशाल संघातून बाहेर बसवा, असा उपरोधिक टोला ख्वाजाने लगावला आहे. 'सुमारे १४०च्या स्ट्राइक रेटने दमदार फलंदाजी करणारा आणि ५०ची सरासरी असणारा खेळाडू जर भारतीय संघाबाहेर बसत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. ऑस्ट्रेलियाची या निर्णयाला सहमती आहे', असे ख्वाजाने लिहिले. याचाच अर्थ, विराट सारखा खेळाडू आगामी टी२० विश्वचषकात खेळला नाही, तर ते प्रतिस्पर्धी संघांसाठी फायद्याचेच ठरेल, असे ख्वाजाने सुचवले.
कपिल देव नक्की काय म्हणाले...
कपिल देव यांच्या म्हणण्यानुसार, कोणताच खेळाडू केवळ आपल्या नावाच्या जोरावर संघात स्थान मिळवू शकत नाही. त्याने संघात टिकून राहण्यासाठी त्या दर्जाची कामगिरी करणे आवश्यक आहे. विराटच्या जागेवर संघात आता युवा खेळाडूंना संधी देण्याची वेळ आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने कपिल देव यांची ही मुलाखत इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. याच मुलाखतीत मतावर ऑस्ट्रेलियन फलंदाज उस्मान ख्वाजाने कमेंट केली असून ती बरीच व्हायरल होत आहे.
"जर तुमच्याकडे खूप सारे पर्याय असतील, तर इन-फॉर्म असलेल्या खेळाडूंना संधी द्या. तुम्ही फक्त नावाच्या जोरावर कोणत्या खेळाडूची निवड करू शकत नाही, त्यासाठी त्याचा फॉर्मदेखील पाहावा लागेल. तुम्ही जरी संघातील प्रमुख खेळाडू असाल तरी याचा अर्थ असा नाही की फॉर्ममध्ये नसतानाही तुम्हाला संघात जागा मिळावी", असेही कपिल देव म्हणाले आहेत. त्याला बऱ्याच चाहत्यांनी आणि खेळाडूंनी उत्तर दिल्याचे दिसत आहे.
Web Title: usman khawaja mock Kapil Dev over his statement on Virat Kohli
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.