ख्वाजाचे दुसऱ्या डावातही शतक; इंग्लंडला ३८८ धावांचे लक्ष्य

सिडनी मैदानात ही तिसरी वेळ आहे जेव्हा एकाच फलंदाजाने दोन्ही डावात शतक झळकावण्याची कामगिरी केली. याआधी माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग याने २००६ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरोधात ही कामगिरी केली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2022 05:56 AM2022-01-09T05:56:53+5:302022-01-09T05:57:25+5:30

whatsapp join usJoin us
Usman Khwaja also scored a century in the second innings; England's target of 388 runs | ख्वाजाचे दुसऱ्या डावातही शतक; इंग्लंडला ३८८ धावांचे लक्ष्य

ख्वाजाचे दुसऱ्या डावातही शतक; इंग्लंडला ३८८ धावांचे लक्ष्य

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

सिडनी : उस्मान ख्वाजा याने कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करताना पहिल्या डावापाठोपाठ दुसऱ्या डावातही शतक झळकावले आहे. ऑस्ट्रेलियाने शनिवारी चौथ्या ॲशेस कसोटी मालिकेत चौथ्या दिवशी दुसरा डाव सहा बाद २६५ धावांवर घोषित केला आणि इंग्लंडला ३८८ धावांचे लक्ष्य दिले. सलामीवीर जॅक क्राउली आणि हसीब हमीद यांनी लक्ष्याचा पाठलाग करताना दिवसाचा खेळ संपेपर्यंत बिनबाद ३० धावा केल्या होत्या.

दिवसाचा खेळ संपला तेव्हा क्राउली २२ आणि हमीद ८ धावा करून खेळत होते. २०१९ नंतर पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या उस्मान ख्वाजा याने पहिल्या डावात १३७ धावा केल्या आणि दुसऱ्या डावात १३८ चेंडूंत नाबाद १०१ धावा केल्या. त्याने कॅमेरून ग्रीनसोबत पाचव्या गड्यासाठी १७९ धावांची भागीदारी केली. ग्रीनने ७४ धावांची खेळी केली. ख्वाजाने ८६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर त्याने वेगाने धावा केल्या. डेविड मालनच्या चेंडूवर दोन धावा घेत त्याने फक्त ४५ चेंडूंत ५० धावा करत शतक पूर्ण केले.

सिडनी मैदानात ही तिसरी वेळ आहे जेव्हा एकाच फलंदाजाने दोन्ही डावात शतक झळकावण्याची कामगिरी केली. याआधी माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग याने २००६ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरोधात ही कामगिरी केली होती. ख्वाजाला ट्रेविस हेडच्या जागी संधी मिळाली आहे. ख्वाजा आणि ग्रीन मैदानात उतरले तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या संघाने चार बाद ८६ धावा केल्या होत्या. एससीजीवर चौथ्या डावात सर्वांत मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्याच नावावर आहे. त्यांनी २००६ मध्ये पॉन्टिंगच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात २८८ धावांचे लक्ष्य गाठले होते.

सिडनीत रविवारी पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे इंग्लंडला सामना ड्रॉ करण्याची संधी मिळू शकते. त्याआधी फिरकीपटू जॅक लीच (८४ धावात चार बळी) याने इंग्लंडसाठी चार बळी घेतले. त्याने डावातील अखेरच्या दोन चेंडूंवर ग्रीन आणि ॲलेक्स कॅरीला बाद केले. जॅक लीच याने उपाहारानंतर मालिकेतील आपला सर्वोत्तम स्पेल केला. त्यात त्याने स्टिव्ह स्मिथ याला बाद केले. तर उपाहाराच्या आधी सलामीवीर मार्कस हॅरीसला बाद केले. 

बटलर, बेअरस्टोला दुखापत, पोप बनला यष्टिरक्षक
जोस बटलर आणि जॉनी बेअरस्टो या दोघांच्या बोटांना दुखापत झाली आहे. त्यामुळे ॲशेस कसोटीत चौथ्या दिवशी ओली पोप इंग्लंडकडून यष्टिरक्षण करण्यास उतरला आहे. पोपला सिडनीत सुरू असलेल्या कसोटीत अंतिम ११ मध्ये जागा मिळाली नाही. मात्र, शनिवारी इंग्लंडचा संघ क्षेत्ररक्षणासाठी उतरला तेव्हा तो बदली क्षेत्ररक्षक म्हणून मैदानात आला. बटलरच्या डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आहे. दुसरा यष्टिरक्षक बेअरस्टो याला पहिल्या डावात फलंदाजी करताना पॅट कमिन्सचा बॉल अंगठ्यावर लागला आहे. इंग्लंडच्या संघ व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे की, बटलर आणि बेअरस्टो या दोघांच्या बोटांचे स्कॅन केले जाईल. इंग्लंडने होबार्टमध्ये पाचव्या ॲशेस मालिकेसाठी सॅम बिलिंग्ज याला संघात जागा दिली आहे. तो सध्या ऑस्ट्रेलियात बिग बॅश टी-२० लीग खेळत आहे. 

ऑस्ट्रेलिया पहिला डाव : १३४ षटकात ८ बाद ४१६ धावा.
इंग्लंड पहिला डाव : ७९.१ षटकात सर्वबाद २५८.
ऑस्ट्रेलिया दुसरा डाव : मार्कस हॅरिस झे. पोप गो. लीच २७, डेव्हिड वॉर्नर झे. पोप गो. वूड ३, मार्नस लाबूशेन झे. पोप गो. वूड २९, स्टीव्ह स्मिथ पायचित गो. लीच २३, उस्मान ख्वाजा नाबाद १०१, कॅमेरुन ग्रीन झे. रुट गो. लीच ७४, ॲलेक्स कॅरी झे. पोप गो. लीच ०. अवांतर - ८, एकूण : ६८.५ षटकात ६ बाद २६५ धावा (डाव घोषित). गडी बाद क्रम : १-१२, २-५२, ३-६८, ४-८६, ५-२६५, ६-२६५. गोलंदाजी : जेम्स अँडरसन १२-१-३४-०, स्टुअर्ट ब्रॉड ११-३-३१-०, मार्क वूड १५-०-६५-२, जॅक लीच २१.५-१-८४-४, ज्यो रुट ७-०-३५-०, डेव्हिड मलान २-०-१३-०.
इंग्लंड दुसरा डाव : झॅक क्राऊली खेळत आहे २२, हसीब हमीद खेळत आहे ८. अवांतर - ०, एकूण : ११ षटकात बिनबाद ३० धावा. गोलंदाजी : मिचेल स्टार्क ४-०-१०-०, पॅट कमिन्स ४-०१५-०, स्कॉट बोलंड ३-१-५-०.

Web Title: Usman Khwaja also scored a century in the second innings; England's target of 388 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.