IPL च्या मेगा लिलावात छोटा पॅक मोठा धमाका केल्यापासून वैभव सूर्यंवशी हा १३ वर्षीय क्रिकेटर सातत्याने चर्चेत आहे. आता हा युवा क्रिकेटर देशांतर्गत क्रिकेटमधील विजय हजारे ट्रॉफीसाठी सुरु असलेल्या वनडे स्पर्धेत बिहारकडून मैदानात उतरला आहे. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या क्रुणाल पांड्याच्या नेतृत्वाखालील बडोदा संघा विरुद्धच्या सामन्यात वैभव सूर्यंवशीनं धमाकेदार खेळी केली.
८ चौकार अन् ४ षटकार, १३ वर्षीय पोराची स्फोटक फलंदाजी
बडोदाच्या संघानं पहिल्यांदा बॅटिंग करताना विकेट किपर बॅटर विष्णून सोळंकी १०९(१०२) शतकी खेळीच्या जोरावर ४९ षटकात २७७ धावा करत बिहार संघासमोर २७८ धावांचं टार्गेट सेट केले होते. या धावांचा पाठलाग करताना वैभवनं बिहारच्या डावाची सुरुवात केली. संघानं पहिली विकेट अगदी स्वस्तात गमावल्यावरही १३ वर्षी वैभव कोणताही दबाव न घेता आपल्या आक्रमक अंदाजातच बॅटिंग करताना दिसले. त्याच्या फटकेबाजीनं बडोदा संघाला बॅकफूटवर ढकलले होते.
पांंड्यानं घेतली युवा बॅटरची विकेट
वैभव सूर्यंवशी याने ४२ चेंडूत ८ चौकार आणि ४ षटकाराच्या मदतीने ७१ धावा केल्या. तो या सामन्यात शतकी खेळी करून संघाच्या विजयाचा मार्ग सहज सुलभ करण्याच्या तयारीत होता. पण बडोदा संघाचा कॅप्टन क्रुणाल पांड्या गोलंदाजीला आला अन् त्याने त्याच्या खेळीला ब्रेक लावला. क्रुणाल पांड्याने या सामन्यात एकमेव पण महत्त्वपूर्ण विकेट घेत सामन्यात ट्विस्ट आणला.
वैभवची फटकेबाजी ठरली व्यर्थ, बडोदा संघानं जिंकला सामना
वैभवची विकेट पडल्यावर बिहारच्या संघाची धावगती मंदावली. कॅप्टन गनीनं ८२ चेंडूचा सामना करून ४३ धावा केल्या. याशिवाय विकेट किपर बॅटर बिपीन सौरभनं ४२ चेंडूत ४० धावा करत संघाला विजयापर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न केला. पण शेवटी निर्धारित ५० षटकात बिहारचा संघ २४१ धावांपर्यंतच मजल मारू शकला. बडोदा संगाने हा सामना ३६ धावांनी जिंकला. वैभव सूर्यंवशीची तुफानी खेळी व्यर्थ ठरली. वैभव सूर्यंवशीची कारकिर्द
आयपीएल मेगा लिलावात राजस्थान रॉयल्स संघानं वैभव सूर्यंवशीवर कोट्यवधीची विक्रमी बोली लावली होती. तो आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात युवा क्रिकेटर ठरला. आतापर्यंत ५ फर्स्ट क्लास मॅच, बडोद्या विरुद्धच्या सामन्यासह ४ लिस्ट ए मॅच आणि १ टी२० सामना खेळला आहे. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याने १० डावात १०० धावा काढल्या आहेत. लिस्ट ए क्रिकेटमध्ये ४ डावात त्याच्या भात्यातून आतापर्यंत ८८ धावा आल्या आहेत. ७१ ही त्याची आतापर्यंतची सर्वोच खेळी राहिलीये. एकमेव टी-२० सामन्यात त्याच्या खात्यात १३ धावांची नोंद आहे.