भारतीय फलंदाज वंशी कृष्णा ( Vamshhi Krrishna ) याने आंध्रप्रदेश संघाकडून खेळताना सी के नायुडू ट्रॉफी स्पर्धेत रेल्वे संघाविरुद्ध सहा चेंडूंत सहा षटकार खेचण्याचा पराक्रम केला. प्रथम फलंदाजी करताना आंध्र प्रदेशच्या संघाचा डाव ३७८ धावांवर गडगडला आणि त्यात कृष्णाच्या ६४ चेंडूंत ११० धावा होत्या. प्रत्युत्तरात रेल्वेने ९ बाद ८६५ धावांवर डाव घोषित केला. पण, हा सामना ड्रॉ राहिला. या सामन्यात कृष्णाने सलग सहा षटकार खेचून युवराज सिंग, रवी शास्त्री यांच्या पंक्तित स्थान पटकावले.
आंध्रकडून यष्टीरक्षक कृष्णाने ९ चौकार व १० षटकारांच्या मदतीने ११० धावांची खेळी केली. त्याच्या व्यतिरिक्त ए धरानी कुमारने १०८ चेंडूंत ८१ धावा ( १० चौकार व २ षटकार), एक वेंकटा राहुलने नाबाद ६६ ( ७ चौकार) धावा चोपल्या. रेल्वेच्या एसआऱ कुमार ( ३-३७), एम जैस्वाल ( ३-७२) व धमनदीप सिंग ( २-१३७) यांनी विकेट्स घेतल्या. एका षटकात सहा षटकार खेचणारा कृष्णा हा चौथा भारतीय फलंदाज ठरला. यापूर्वी रवी शास्त्री ( १९८५), युवराज सिंग ( २००७) आणि ऋतुराज गायकवाड ( २०२२) यांनी असा पराक्रम केला आहे.
रेल्वेने फलंदाजीत कमाल केली. अंश यादवने २६८ धावांची खेळी केली. त्याला रवी सिंगने २५८ धावा चोपून चांगली साथ दिली. रवी सिंगच्या खेळीत १७ चौकार व १३ षटकारांचा समावेश होता. अंचित यादवनेही १३३ धावा चोपल्या. शिवम गौतम ( ४६), तौफिक उद्दीन ( ८७) व कर्णधार पुर्नांक त्यागी ( ३६) यांनी चांगला खेळ केला. २३१ षटकांत ९ बाद ८६५ धावांवर रेल्वेने डाव घोषित केला.