कॅनडा : युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलची ग्लोबल ट्वेंटी-20 लीगमध्ये फटकेबाजी सुरूच आहे. शुक्रवारी झालेल्या सामन्यात त्यानं एडमोंटन रॉयल्स संघाच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. त्याच्या खेळीच्या जोरावर व्हँकव्हर नाइट्स संघाने रॉयल्सचे 165 धावांचे आव्हान 16.3 षटकांत 4 विकेट्सच्या मोबदल्यात पार केले. नाइट्स संघाने विजय मिळवला असला तरी गेलचे सलग दुसरे शतक हुकले.
प्रथम फलंदाजीला आलेल्या रॉयल्सची सुरुवातच निराशाजनक झाली. नवनीत धलीवाल ( 5), रिचर्ड बेरींग्टन ( 1) आणि कर्णधार मोहम्मद हाफिज ( 6) हे आघाडीचे तीन फलंदाज स्वस्तात बाद झाले. बेन कटींग आणि मोहम्मद नवाझ यांनी रॉयल्सची गाडी रुळावर आणली. कटींगने 41 चेंडूंत 3 चौकार व 7 षटकार खेचून 72 धावा केल्या, तर नवाझने 27 चेंडूंत 3 षटकारांच्या मदतीनं 40 धावा चोपल्या. त्यांच्या खेळीच्या जोरावर रॉयल्सने 9 बाद 165 धावा उभ्या केल्या.
प्रत्युत्तरात नाइट्सचा सलामीवीर टोबियास व्हीसे (1) लगेच माघारी परतला. नाइट्सच्या 8 षटकांत 2 बाद 58 धावा झाल्या होत्या. त्यानंतर पुढील 8 षटकांत गेलच्या वादळी खेळीच्या जोरावर त्यांनी शंभरहून अधिक धावा चोपल्या. गेलने 44 चेंडूंत 213.64च्या स्ट्राईक रेटनं 9 षटकार व 6 चौकारांच्या सहाय्यानं 94 धावा केल्या. त्याला शोएब मलिकने 34 धावा करत योग्य साथ दिली. रॉयल्सचे 165 धावांचे आव्हान त्यांनी 16.3 षटकांत 4 विकेट्सच्या मोबदल्यात पार केले.
पाहा व्हिडीओ..
'युनिव्हर्सल बॉस'ची वादळी खेळी; 12 षटकार व 7 चौकारांची आतषबाजीव्हँकोव्हर नाइट्स आणि मॅन्ट्रियल टाइगर्स या लढतीत गेलची शतकी खेळी पाहायला मिळाली. त्यानं 12 षटकार व 7 चौकारसह 54 चेंडूंत 122 धावा चोपल्या. अर्धशतक होण्यापूर्वी गेल इतका आक्रमक नव्हता. त्याने 28 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि त्यानंतर शतकी खेळीसाठी त्याने केवळ 19 चेंडूंचा सामना केला. तसेच गेल व्यतिरिक्त व्हॅन डेर ड्यूसेनने 25 चेंडूंत 56 धावा केल्या. ज्यात तीन चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता. व्हँकोव्हर नाइट्सने मॅन्ट्रियल टाइगर्सच्या विरुद्ध 20 षटकांत 276 धावांचा डोंगर उभा केला. मात्र एवढ्या धावा करुनसुद्दा त्याच्या टीमला विजयापासून दूरच रहावे लागले. कारण, खराब हवामानामुळे दूसरा डाव झाला नाही आणि दोन्ही संघांना 1- 1 गुण देण्यात आले.