क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे आणि यात काहीही होऊ शकतं. बुधवारी क्वालालम्पूर येथे असाच एक विक्रम घडला. एकीकडे ट्वेंटी-20 सामन्यांत धावांचा पाऊस पडत असताना दुसरीकडे वन डे क्रिकेटमध्ये मात्र धावांचा ओघ आटलेला पहायला मिळत आहे. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये फलंदाजांचे वर्चस्व दिसत असले तरी गोलंदाजांनी करून दाखवलेला पराक्रम हा सर्वांना अचंबित करणारा आहे.
व्हॅन्युआतू आणि मलेशिया यांच्यातील 50 षटकांच्या सामन्यात हा पराक्रम घडला. वन डे वर्ल्ड कप चॅलेंज लीग ए गटातील हा सामना होता. प्रथम फलंदाजी करताना व्हॅन्युआतूचा संपूर्ण संघ 25.1 षटकांत 65 धावांत तंबूत परतला. नलीन निपिको ( 12) हा त्यांच्याकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. सहा फलंदाजांना तर दुहेरी आकडाही गाठला आला नाही. मलेशियाच्या पवनदीप सिंग ( 4/16) आणि नाझ्रील रहमान ( 4/14) यांनी प्रत्येकी चार विकेट्स घेत व्हॅन्युआतूचे कंबरडे मोडले.
मलेशियाचा संघ हे लक्ष्य सहज पार करेल असे वाटले होते. पण, होत्याचे नव्हते झाले. मलेशियाचा निम्मा संघ अवघ्या 7 धावांतच तंबूत परतला. पॅट्रीक मॅटोटाव्हानं 19 धावांत 5 विकेट्स घेतला. अमिनुद्दीन रॅम्ली ( 25) आणि नाझ्रील रहमान ( 10) हे वगळता मलेशियाचे सर्व फलंदाज एकेरी धावेत माघारी परतले. अपोलिनैर स्टीफन ( 3/30) याने मलेशियाला आणखी धक्के दिले. मलेशियाचा संपूर्ण संघ 21.4 षटकांत 52 धावांत माघारी परतला. व्हॅन्युआतूने 13 धावांनी हा सामना जिंकला.
लिस्ट A क्रिकेटमध्ये हा विक्रम आहे. सर्वात कमी धावा करूनही त्याचा यशस्वीरित्या बचाव करण्याचा विक्रम आज व्हॅन्युआतू संघाने नावावर केला. त्यांनी 1972चा मिडलसेक्स वि. नॉर्थअॅम्पटनशायर संघांचा ( 77) आणि 1976चा वेस्टर्न ऑस्ट्रेलिया वि. क्विन्सलँड ( 78) यांचा विक्रम मोडला.