Join us  

शिखर धवन कायद्याच्या कचाट्यात सापडणार?; स्वतःहून दिलं संकटाला आमंत्रण

Shikhar Dhawan सध्या सुट्टी एन्जॉय करत आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात मिळवलेल्या विजयाचं सेलिब्रेशन केल्यानंतर शिखर धवन गंगा किनारी पोहोचला.

By स्वदेश घाणेकर | Published: January 24, 2021 10:06 AM

Open in App

 भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन ( Shikhar Dhawan) सध्या वाराणसी दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रेलियातील वन डे व ट्वेंटी-20 मालिकेनंतर धवन आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. आता इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी निवडण्यात आलेल्या टीम इंडियातही त्याच्या नावाचा समावेश नाही. त्यामुळे पुढील महिनाभर तो क्रिकेटपासून दूर राहणार आहे. या कालावधीत तो सोशल मीडियावर सक्रिय दिसला. त्याच्या चाहत्यांसाठी तो सातत्यानं सोशल मीडियावर फोटो व व्हिडीओ पोस्ट करत आहे. असाच एक फोटो त्यानं नुकताच पोस्ट केला, परंतु त्यामुळे तो कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

धवन सध्या सुट्टी एन्जॉय करत आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात मिळवलेल्या विजयाचं सेलिब्रेशन केल्यानंतर शिखर धवन गंगा किनारी पोहोचला. मंगळवारी वाराणसी येथे पोहोल्यानंतर धवनने बाबा विश्वानाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले, त्यानंतर कालभैरव मंदिरात जाऊन विशेष अभिषेकही केला. सध्या अध्यात्मात तल्लीन झालेल्या शिखरने गंगा किनारी जाऊन आरतीत सहभागी होण्याचा आनंदही घेतला. वाराणसीत नावेतून फिरतानाचे काही फोटो त्यानं पोस्ट केले आहेत. त्यात तो पक्ष्यांना दाणे खाऊ घालताना दिसत आहे आणि याच कृतीमुळे त्यानं स्वतःवर संकट ओढावून घेतलं आहे.

देशात बर्ड फ्लूचं सावट असताना पक्ष्यांना हाताळणं किंवा त्यांच्या संपर्कात येणे टाळावे असे प्रशासनाने बजावले आहे. तरीही धवनने पक्ष्यांना दाणे खाऊ घातले आणि त्यामुळे त्याच्यावर कारवाईची शक्यता आहे. धवननं इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट केल्यानंतर स्थानिक प्रशासनाने त्वरित या प्रकरणाची माहिती घेतली. येथील स्थानिक प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार त्याच्यावर कारवाई होऊ शकते. 

वाराणसीचे जिल्हाधिकारी कौशल राज शर्मा यांनी सांगितलं की, ''धवन नावेतून विहारासाठी गेला होता. त्यावेळी त्यानं काही पक्षांना खाऊ घातलं. बर्ड फ्लूचं संकट असल्यामुळे परदेशी पक्ष्यांना दाणे खायला घालण्यावर बंदी आहे. धवनने पोस्ट केलेल्या फोटोत तो पक्ष्यांना दाणे देताना दिसत आहे. याबाबतची चौकशी सुरू आहे आणि शिवाय त्या नाविकावरसुद्धा कारवाई केली जाणार आहे.''

टॅग्स :शिखर धवनवाराणसीबर्ड फ्लू