Join us  

वरुण चक्रवर्ती फिटनेस चाचणीत पुन्हा अपयशी

खांदेदुखीमुळे नटराजन काही सामन्यांना मुकणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 1:38 AM

Open in App

अहमदाबाद : लेग स्पिनर वरुण चक्रवर्ती पुन्हा एकदा फिटनेस चाचणीत अपयशी ठरला. इंग्लंडविरुद्ध शुक्रवारी सुरू होत असलेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत तो खेळू शकणार नाही. वेगवान गोलंदाज टी. नटराजन हादेखील खांदेदुखीमुळे या मालिकेतील काही सामन्यांना मुकणार आहे.वरुण बेंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत(एनसीए) सतत फिटनेस चाचणी उत्तीर्ण करण्यात अपयशी ठरला. यॉर्करतज्ज्ञ नटराजन हा देखील जखमी असल्याने अद्याप संघासोबत जुळलेला नाही.

सूत्रांनी सांगितले की, मुश्ताक अली टी-२० स्पर्धेदरम्यान वरुण पुनर्वसन कार्यक्रमात होता, हे समजू शकतो. मात्र विजय हजारे करंडकातही तो खेळू शकला नाही, मग पाच महिन्यांआधी खेळलेल्या सामन्याच्या आधारे त्याची फिटनेस चाचणी कशी काय झाली? माझ्या मते चक्रवर्तीचे उदाहरण निवडकर्त्यांसाठी मोठा बोध आहे. एखादा खेळाडू संघाच्या नियमांमध्ये फिट बसत नसेल तर केवळ गोलंदाजीमुळे त्याची निवड करण्यात येऊ नये.मालिकेच्या सुरुवातीपासून बायोबबलमध्ये असलेला राहुल चाहर याची मालिकेसाठी निवड करण्यात येईल,अशी माहिती आहे. नटराजन हा काही सामने खेळावा यासाठी एनसीएचे वैद्यकीय पथक त्याच्या उपचारावर मेहनत घेत आहे. राहुल तेवतिया भारतीय संघासोबत सरावात व्यस्त आहे. त्याच्या चाचणीच्या निकालाची प्रतीक्षा असेल.

निवड समिती संकटातनाव उघड न करण्याच्या अटीवर बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की,खांद्याच्या दुखापतीतून सावरल्यामुळे वरुण चक्रवर्तीची निवड करण्यात आली होती. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर झाल्यापासून तो एनसीएत पुनर्वसन कार्यक्रमात सहभागी झाला होता.  तथापि दोन किमी अंतर धावायचे असल्याने किमान दोनदा तो ‘यो यो’ चाचणी उत्तीर्ण करण्यात अपयशी ठरला. यामुळे ऑक्टोबरपासून स्वत:च्या तामिळनाडू संघासाठी देखील खेळू न शकलेल्या जखमी खेळाडूची निवड चेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय निवड समितीने केलीच कशी, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघ