आयपीएलमध्ये काल सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईटरायडर्स यांच्यात झालेल्या अटीतचीच्या सामन्यात कोलकात्याने हैदराबादला ५ धावांनी पराभूत केले होते. या सामन्यात शेवटच्या षटकात सनरायझर्सला केवळ ९ धावांती गरज होती. मात्र केकेआरचा फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने हैदराबादच्या फलंदाजांना फिरकीच्या जाळ्यात गुंतवून संघाला सनसनाटी विजय मिळवून दिला. दरम्यान, या विजयानंतर वरुण चक्रवर्तीने आपल्या जादुई कामगिरीमागचं गुपित सांगितलं आहे.
अखेरच्या षटकात सनरायझर्स हैदराबादला विजयासाठी ६ चेंडूत ९ धावांची गरज होती. त्यावेळी केकेआरचा कर्णधार नितीश राणा याने वरुण चक्रवर्तीला गोलंदाजीसाठी पाचारण केले. त्यावेळी फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेला अब्दुल समद हा स्ट्राईकवर होता. या षटकातील पहिल्या चेंडूवर एकेरी धाव घेत भुवनेश्वर कुमारकडे स्ट्राईक दिली. भुवीने दुसऱ्या चेंडूवर लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळवली. मात्र पुन्हा स्ट्राईकवर आलेला अब्दुल समद तिसऱ्या चेंडूवर बाद झाला. चौथा चेंडू मयांक मार्कंडेयला धाव घेता न आल्याने निर्धाव गेला. पाचव्या चेंडूवर मयांकने एक धाव काढली. मात्र शेवटच्या चेंडूवर सहा धावांची गरज असताना भुवनेश्वर कुमारला धाव घेता आली नाही. अशा प्रकारे हा सामना कोलकाता नाईटरायडर्सने ५ धावांनी जिंकला.
या विजयानंतर वरुण चक्रवर्तीने सांगितले की, शेवटच्या षटकामध्ये माझ्या हृदयाचे ठोके २०० पर्यंत वाढले होते. फलंदाजाने मैदानातील लांब भागात फटके खेळावेत, असं माझं नियोजन होतं. चेंडू हातातून सुटत होता. अशा परिस्थितीत माझा सर्वात चांगला डाव लाँग साईड होता, तसेच तीच माझी एकमेव आशा होती. मी माझ्या पहिल्या षटकामध्ये १२ धावा दिल्या होत्या. मार्क्रमने त्या षटकात दोन चौकार ठोकले होते. गतवर्षी मी ८५ किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करत होतो. मी अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. नंतर मला आपल्या रेव्होल्युशनवर काम करण्याची गरज आहे, असे मला वाटले. त्यानंतर मी त्याच्यावर काम केले.
हैदराबादविरुद्धच्या सामन्यात वरुण चक्रवर्तीने ४ षटकांमध्ये २० धावा देऊन एक बळी मिळवला होता. त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. या विजयासोबतच केकेआरने प्लेऑफमध्ये पोहोचण्याचे आव्हान कायम ठेवले आहे. केकेआरचा दहा सामन्यांमधील हा चौथा विजय ठरला आहे. केकेआर चार विजय आणि ८ गुणांसह गुणतक्त्यामध्ये आठव्या स्थानी आहे. तर हैदराबादचा संघ हा सहा गुणांसह नवव्या स्थानी आहे.
Web Title: Varun Chakraborty finally revealed the secret of how the match was pulled from the jaws of Sunrisers in the last over, said...
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.