ठाणे -
घंटाळी प्रबोधिनी संस्था, ठाणेच्या वतीने आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या संलग्नतेने दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहामध्ये आयोजित केलेल्या घंटाळी देवी चषक १४ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी वसंत विहार स्कूल आणि श्री माँ विद्यालय यांच्यात अंतिम सामना अटीतटीचा रंगला. त्यात वसंत विहार शाळेच्या खेळाडूंनी एक गडी राखून निसटता विजय मिळविला.
नाणेफेक जिंकून श्री माँ शाळेने फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र सलामीवीर चटकन बाद झाल्यानंतर मधल्या फलंदाजांनी संथ गतीने फलंदाजी केली. कामेश जाधव (३९ धावा), ऋग्वेद जाधव (२६ धावा), अभिनंदन चव्हाण (२२ धावा) यांनी चांगली खेळी केली मात्र इतर फलंदाजांनी निराशा केली. ३० षटकात ९ गडी बाद १२० धावा श्री माँ विद्यालयाने केल्या. वसंत विहार चे गोलंदाज दर्श पिल्लई, जस्वा कोठारी आणि प्रथम पटेल यांनी प्रत्येकी २ फलंदाज बाद केले.
कमी धावसंख्या असल्याने श्री माँ शाळेची सर्व मदार गोलंदाजीवर होती. सुरुवातीच्या ९ षटकात इशांन तावडे आणि अथर्व सुर्वे यांनी वसंत विहार स्कूलचे ५ फलंदाज बाद केले. इशांन तावडे याने ३ तर अथर्व सुर्वे याने २ फलंदाज बाद केले. त्यानंतरही वसंत विहार स्कूलचे फलंदाज बाद होत होते. मात्र श्री माँ विद्यालयाच्या गोलंदाजांची दोन षटके वसंत विहार स्कूलच्या जस्वा कोठारी याने झोडपून काढली आणि सामना श्री माँ शाळेच्या हातून निसटला. जस्वा कोठारी याने २ षटकार आणि ४ चौकार मारत सामना आपल्या बाजूने फिरवला. २५ चेंडूत त्याने ४० धावा केल्या. मात्र कोठारी बाद झाल्यानंतर पुन्हा सामन्यात चुरस आली. शेवटची काही षटके उत्कंठावर्धक झाली. श्री माँ विद्यालयाला शेवटी १ फलंदाज बाद करायचा होता मात्र अखेर वसंत विहार ने बाजी मारली. वसंत विहारच्या वेदांत चव्हाण याने ४५ धावा केल्या. श्री माँ च्या आदित्य कौलगी यानेही टिच्चून गोलंदाजी करत २ बळी घेतले.
खासदार राजन विचारे यांच्या हस्ते विजयी आणि उपविजेता संघाला चषक देण्यात आले. पारितोषिक सोहळ्याला मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अपेक्स कौंसिलचे सदस्य अभय हडप, नदीम मेमन, न्यू इन् स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष भोर सर, घंटाळी प्रबोधिनी संस्था ठाणे चे अध्यक्ष विलास सामंत, रणजीपटू संदिप दहाड, ज्येष्ठ नगरसेवक दशरथ पालांडे, ठा.म.पा. क्रीडा उपायुक्त सौ. मीनल पालांडे, किशोर सावला व घंटाळी प्रबोधिनी संस्था विश्वस्त चैतन्य सामंत ह्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्पर्धा समन्वयक सागर जोशी, राज्यस्तरीय क्रिकेटपटू यांनी केले.
Web Title: Vasant Vihar School wins Shri Ghantali Devi Cup Shri Maa Vidyalaya loses
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.