ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya) संघातील समावेशाबद्दल अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. दुखापतीतून पूर्णपणे सावरला नसताना अन् गोलंदाजीही करू शकत असलेल्या हार्दिकची निवड का केली गेली?, असा सवाल अनेकांनी केला. त्यानंतर हार्दिकला तंदुरुस्ती सिद्ध करण्यासाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत ( NCA) दाखल होण्यास बीसीसीआयने सांगितले. तंदुरुस्ती सिद्ध केल्यानंतरच त्याचा पुनरागमनासाठी विचार केला जाणार असल्याचे स्पष्ट संकेत BCCIकडून दिले गेले आहेत. अशात आगामी ट्वेंटी-२० व वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचा विचार करता मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड व कर्णधार रोहित शर्मा यांनी हार्दिकला पर्याय म्हणून शोधाशोध सुरू केली आहे आणि त्यांना तगडा पर्याय सापडलाही आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत टीम इंडियानं कोलकाता नाईट रायडर्सचा अष्टपैलू खेळाडू वेंकटेश अय्यरला संधी दिली. पण, पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा असल्यानं अन् खेळ दाखवण्याचा पुरेसा वेळ न मिळाल्यानं प्रभाव पाडता आला नाही. पण, विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत वेंकटेशनं दमदार कामगिरी करताना टीम इंडियासाठी दावेदारी सांगितली आहे. भारतीय संघ १६ डिसेंबरला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे आणि या दौऱ्यासाठी सध्या कसोटी संघच जाहीर केला गेला आहे. विजय हजारे ट्रॉफीतील खेळाडूंच्या कामगिरीवर निवड समितीचे बारीक लक्ष आहे. स्थानिक स्पर्धेतील कामगिरीचा विचार केला जावा, अशी भूमिका द्रविडनं घेतली आहे. त्यामुळे आफ्रिका दौऱ्यासाठीचा वन डे संघ जाहीर करताना अनेक नवीन चेहरे पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
वेंकटेशनं Vijay Hazare Trophy 2021-22 मागीत तीन सामन्यांत दोन शतकं व एक अर्धशतक झळकावलं. महाराष्ट्रविरुद्धच्या सामन्यात ४७व्या षटकात फलंदाजीला आलेल्या वेंकटेशनं ५ चेंडूंत १४ धावा केल्या होत्या. त्यानंतर केरळाविरुद्ध चौथ्या क्रमांकावर येऊन ८४ चेंडूंत ११२ धावा आणि उत्तराखंडविरुद्ध ५व्या क्रमांकावर येताना ४९ चेंडूंत ७१ धावा केल्या. मध्य प्रदेशचे प्रतिनिधित्व करताना वेंकटेशनं आज दीडशतकी खेळी केली. चंडिगढ विरुद्ध मध्यप्रदेशची अवस्था ४ बाद ५६ अशी झालेली असताना वेंकटेश मैदानावर उतरला. कर्णधार आदित्य श्रीवास्तवसोबत त्यानं पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. आदित्य ७० धावांवर माघारी परतला.
वेंकटेशनं त्यानंतर एकट्यानं खिंड लढवताना ११३ चेंडूंत १५१ धावांचा पाऊस पाडला. यात त्यानं ८ चौकार व १० षटकार अशा ९२ धावा अवघ्या १८ चेंडूंत कुटल्या. त्याच्या या खेळीच्या जोरावर मध्य प्रदेशनं ९ बाद ३३१ धावांचा डोंगर उभा केला.
अन्य महत्त्वाची बातमी
हार्दिक पांड्या करतोय निवृत्तीचा विचार, बीसीसीआयला कळवलाय भविष्याचा प्लान, जाणून घ्या नेमकं काय