नवी दिल्ली : भारताचे माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद यांनी शुक्रवारी राष्ट्रीय ज्युनिअर निवड समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. या पदाचा प्रसाद यांनी ३० महिने कार्यभार पाहिला आणि १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ जगज्जेता बनल्याच्या एका महिन्याच्या आत त्यांनी पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, प्रसाद यांनी वैयक्तिक कारणामुळे पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर येत असून ‘आपण लोढा समितीच्या हितसंबंधांच्या शिफारशीमुळे पदाचा राजीनाम देत आहे,’ असे प्रसाद यांनी सांगितले.बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने वृत्तसंस्थेला माहिती दिली, की ‘आतापर्यंत काहीच स्पष्ट झालेले नाही, पण प्रसाद कुठल्यातरी आयपीएल फ्रँचाइजीसह जुळत असल्याची शक्यता आहे. त्यामुळेच ते हितसंबंधांच्या शिफारशीपासून स्वत:चा बचाव करू पाहतात.’ त्याचप्रमाणे बीसीसीआयचे कार्यवाहक अध्यक्ष सी. के. खन्ना यांना प्रसाद यांच्या राजीनाम्याविषयी विचारले असता त्यांनी सांगितले की, ‘मी त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला, पण असे वाटते की त्यांनी आपला अंतिम निर्णय निश्चित केलेला आहे. गुणवत्ता ओळखण्याचे अप्रतिम कौशल्य त्यांच्याकडे आहे. विश्वविजेता होणा-या युवा संघाच्या निवड प्रक्रियेतील त्यांचे योगदान मोलाचे आहे.’विशेष म्हणजे, प्रसाद यांनी अन्य सहा राष्ट्रीय निवडकर्त्यांच्या तुलनेत (तीन वरिष्ठ व तीन ज्युनिअर) सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. प्रसाद यांनी ३३ कसोटी आणि १६१ एकदिवसीय सामने खेळले आहेत. इतर निवडकर्त्यांनी खेळलेल्या एकूण सामन्यांहून प्रसाद यांच्या सामन्यांची संख्या जास्त आहे. (वृत्तसंस्था)
- Cricket Buzz»
- बातम्या»
- व्यंकटेश प्रसाद यांनी दिला राजीनामा, ज्युनिअर निवड समितीच्या अध्यक्षपदावरून झाले दूर
व्यंकटेश प्रसाद यांनी दिला राजीनामा, ज्युनिअर निवड समितीच्या अध्यक्षपदावरून झाले दूर
भारताचे माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद यांनी शुक्रवारी राष्ट्रीय ज्युनिअर निवड समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2018 11:54 PM