नवी दिल्ली : भारतीय संघ बांगलादेशच्या धरतीवर 3 सामन्यांची वन डे मालिका खेळत आहे. मात्र मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून यजमान संघाने 2-0 ने विजयी आघाडी घेतली आहे. आयसीसी क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या बांगलादेशच्या संघाकडून भारताचा पराभव झाल्याने संघावर विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. रोहित सेनेच्या कामगिरीवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अशातच भारताचे माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद यांनी संघ व्यवस्थापनाला कठोर निर्णय घ्यावे लागतील असा सल्ला दिला आहे. बांगलादेशविरूद्धच्या मालिकेपूर्वी भारतीय संघाला न्यूझीलंडविरूद्धची वन डे मालिका गमवावी लागली होती.
भारतीय संघात बदल करण्याची आवश्यकता
भारताचा काल पराभव झाल्यानंतर व्यंकटेश प्रसाद यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटले, "जगभरात भारत अनेक क्षेत्रात पुढाकार घेत आहे, परंतु मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आमची रणनीती जुनीच आहे. 2015च्या विश्वचषकात पहिल्याच फेरीत बाद झाल्यानंतर इंग्लंडने कठोर निर्णय घेतले आणि आज तो एक शानदार संघ बनला आहे. भारतालाही कठोर निर्णय घेऊन आपली विचारसरणी बदलावी लागेल."
प्रसाद यांनी आणखी एक ट्विट करून बीसीसीआयला सल्ला दिला आहे. "आयपीएल सुरू झाल्यापासून आम्ही एकही ट्वेंटी-20 विश्वचषक जिंकलेला नाही आणि मागील पाच वर्षांत एखादी द्विपक्षीय मालिका जिंकण्याशिवाय वन डे सामन्यांमध्ये देखील फारसे काही केले नाही. त्यामुळे भारतीय संघात बदल आवश्यक आहे."
बांगलादेशची विजयी आघाडी
दरम्यान, दुखापतग्रस्त रोहित शर्माच्या धाडसी खेळीनंतरही सलग दुसऱ्या सामन्यात मेहदी हसन मिराजच्या अप्रतिम कामगिरीने बांगलादेशने विजय मिळवला. बांगलादेशने बुधवारी दुसऱ्या वन डे सामन्यात पाच धावांनी रोमहर्षक विजय नोंदवून तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत सात गड्यांच्या मोबदल्यात 271 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ 9 गडी गमावून केवळ 266 धावा करू शकला. कर्णधार रोहित शर्माने दुखापत असताना देखील संघर्ष केला मात्र त्याची झुंज अयशस्वी ठरली आणि भारताला 5 धावांनी सामन्यासह मालिका गमवावी लागली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Venkatesh Prasad said that Indian team has not won a single Twenty20 World Cup since the start of IPL
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.