नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक ग्रेग चॅपल यांनी राजस्थान क्रिकेट अकादमीच्या आपल्या कार्यकाळामध्ये एकदा दीपक चहरला नाकारले होते. इतकेच नाही, तर त्यांनी चहरला क्रिकेट सोडून इतर दुसरे काम करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे विदेशी प्रशिक्षकांच्या मताला गंभीरपणे घेऊ नये,’ असे स्पष्ट मत भारताचा माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद याने व्यक्त केले.
चहरने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजयी खेळी करताना भारताला श्रीलंकेविरुद्ध हातातून गेलेला सामना जिंकवून दिला होता. चॅपेल यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांनी त्यांना राजस्थान क्रिकेट अकादमीचे क्रिकेट निर्देशक म्हणून नियुक्त केले होते. तेव्हा चॅपेल यांनी नवोदित चहरला नाकारले होते.
याबाबत प्रसाद म्हणाले की, ‘दीपक चहरला उंचीमुळे ग्रेग चॅपेल यांनी आरसीएमध्ये नाकारले होते. यावेळी त्यांनी त्याला दुसरे काम शोधण्याचा सल्लाही दिला. मात्र, त्याने आता स्वत:च्या हिमतीवर भारताला विजयी केले आहे आणि तेही तज्ज्ञ फलंदाज नसताना. यातून मला हेच सांगायचे आहे की, स्वत:वर विश्वास ठेवा. विदेशी प्रशिक्षकांचे मत फारसे गंभीरपणे घेण्याची गरज नसते.’
प्रसाद यांनी पुढे म्हटले की, ‘भारतात गुणवत्तेची कोणतीही कमतरता नाही. त्यामुळे फ्रेंचाईजींनी भारतीय प्रशिक्षकांना आणि भारतीय मेंटर ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा.’