सुनील गावस्कर,स्ट्रेट ड्राईव्हकेकेआरने दिल्लीवर विजय नोंदवून प्ले ऑफच्या दिशेने कूच केली. विजयामुळे संघात उत्साह संचारला शिवाय आणखी चांगल्या कामगिरीची प्रेरणा निर्माण झाली. केकेआरला आता जिंकता जिंकता पराभूत होणाऱ्या पंजाबविरुद्ध खेळायचे आहे. मात्र, टी-२० सारख्या प्रकारात कुठलाही सामना सोपा नसतो हे इयोन मोर्गनला चांगले ठाऊक आहे.
मागच्या पर्वासारखी पंजाबची फलंदाजी स्फोटक दिसत नाही. खेळपट्ट्या मंद असल्याने फिरकीपटू शानदार मारा करीत फलंदाजांना अडचणीत आणत आहेत. केकेआर संघ फिरकीत बलाढ्य आहे. सुनील नरेन आणि वरुण चक्रवर्ती हे फलंदाजांभोवताल अलगद जाळे निर्माण करतात. क्रिजचा योग्य वापर न करणारे फलंदाज या जाळ्यात अडकतात. दोघेही फलंदाजांना पुढे येऊन खेळण्याची संधीच देत नाहीत.
केकेआरकडे व्यंकटेश अय्यर आहे. तो चांगला अष्टपैलू बनू शकेल. टीम इंडियाला अशाच खेळाडूचा शोध आहे. त्याच्या चेंडूत वेग नसेल; पण यॉर्कर अचूक टाकत असल्याने फलंदाज मोठा फटका मारण्याची हिंमत दाखवीत नाहीत. फलंदाज म्हणूनही आखूड टप्प्याचा चेंडू चांगला खेळतो. ड्राईव्हचा फटका सुरेख मारतो. राहुल त्रिपाठी चांगल्या धावा काढत असून, मोर्गन हा गरजेनुसार फटकेबाजी करू शकतो. मागच्या काही सामन्यात विजय मिळाल्यामुळे या संघाला आंद्रे रसेलची उणीव जाणवली नसावी. रसेल गेम चेंजर असल्याने महत्त्वाच्या सामन्याआधी मात्र तो फिट व्हावा, अशी अपेक्षा नक्की असेल.