पोर्ट ऑफ स्पेन - वेस्ट इंडिजचे माजी कसोटीपटू जागतिक क्रिकेटमधील दिग्गज फिरकीपटू सोनी रामाधीन यांचं निधन झालं. ते ९२ वर्षांचे होते. सोनी रामाधीन इंग्लंडमध्ये १९५० मध्ये कसोटी मालिका जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजच्या संघाचे ते प्रमुख सदस्य होते. क्रिकेट वेस्ट इंजिजने त्यांच्या निधनाची माहिती दिली. सोनी रामाधीन यांच्या नावावर एक खास रेकॉर्ड आहे जो अद्याप अबाधित आहे. रामाधीन यांनी १९५७ मध्ये कसोटीच्या एका डावात सर्वाधित चेंडू फेकण्याचा विक्रम केला होता. तो विक्रम गेल्या ६५ वर्षांत कुणीही मोडू शकलेला नाही.
इंग्लंडविरुद्ध १९५० मध्ये झालेल्या ओल्ड ट्रॅफर्ड कसोटीमधून रामाधीन यांनी पदार्पण केले होते. त्यांनी ४३ कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व केले होते. त्यात त्यांनी २८.९८ च्या सरासरीने १५८ विकेट्स मिळवल्या होत्य. वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष रिकी स्केरिट यांनी रामाधीन यांना श्रद्धांजली वाहताना सांगितले की, क्रिकेट वेस्ट इंडिजकडून मी रामाधीन यांचे कुटुंब आणि त्यांच्या मित्रांप्रति सहानुभूती व्यक्त करतो.
सोनी रामाधीन यांनी वेस्ट इंडिजच्या इंग्लंडमधील पहिल्या विजयावेळी लॉर्ड्सवर १५२ धावा देत ११ विकेट घेतले होते. वेस्ट इंडिजने १९५० मधील ती ऐतिहासिक कसोटी मालिका ३-१ ने जिंकली होती. सोनी रामाधीन यांनी एक ऐतिहासिक कामगिरी १९५७ च्या बर्मिंगहॅम कसोटीत केली होती. त्या कसोटीत त्यांनी एका डावात एकूण ९८ षटके सुमारे ५८८ चेंडू टाकले होते. या सामन्यात त्यांनी एकूण ७७४ चेंडू टाकले होते. त्यांचे हे विक्रम अद्याप अबाधित आहेत. मात्र हा सामना अनिर्णित राहिला होता. रामाधीन यांनी ९८ षटकांत एकूण ३५ षटके निर्धाव टाकली होती. तर एकूण २ विकेट्स टिपल्या होत्या. तर पहिल्या डावात ३१ षटकांमध्ये ७ फलंदाजांना बाद केले होते.