इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२४ च्या लिलावाचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. सर्व १० फ्रँचायझींनी पुढील वर्षीच्या स्पर्धेपूर्वी त्यांचे संघ मजबूत करण्याचा विचार करत आहेत. चेन्नई सुपर किंग्जने ( CSK) अष्टपैलू बेन स्टोक्स करारमुक्त केले आहे, तर मधल्या फळीतील फलंदाज अंबाती रायुडूने खेळाच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. रायुडूच्या जागी करुण नायरसाठी सुपर किंग्ज लिलावात बोली लावू शकतात, असे मत भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने व्यक्त केले. अश्विनने काही दिवसांपूर्वी धोनी व रोहित शर्मा यांच्या कॅप्टन्सीमधला फरक सांगितला होता.
"मला वाटते की CSK करुण नायरवर ते पैसे गुंतवतील. ते अंबाती रायुडूचा पर्यात शोधत आहेत. चौथ्या क्रमांकावर शाहरुख खान पर्याय बनू शकत नाही. त्यामुळे रायुडूच्या स्थानावर कोण खेळणार, याची मला कल्पना नाही. ते डावखुऱ्या फलंदाजाचा पर्याय वापरून पाहू शकतात, परंतु जर तुम्ही CSK चा ट्रॅक रेकॉर्ड बघितला तर, ते कधीही चुकीची रणनीती आखत नाही. त्यांनी कधीही सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या पहिल्या सत्रात चांगली कामगिरी केलेल्या अशा कोणाला खेळवले नाही. त्यामुळे करुण नायरला पिवळ्या जर्सीत पाहण्यासाठी सज्ज व्हा. मी हे ठामपणे सांगत नाही, फक्त रवी शास्त्रींची छाप पाडत आहे," असे अश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनेलवरील व्हिडिओमध्ये म्हटले आहे
अश्विनने MS Dhoniचे उदाहरण देऊन असे सुचवले की, त्याच्या फिरकी गोलंदाजी खेळण्याच्या क्षमतेमुळे त्याला संघात करुण नायरसारखा फलंदाज घ्यायला आवडेल. "करुण नायर फिरकीवर चांगला खेळू शकतो, जो स्वीप आणि रिव्हर्स स्वीप मारू शकतो. धोनीला हे आवडते जेव्हा टॉप ऑर्डर आणि मधल्या फळीमध्ये चौथ्या क्रमांकावर खेळू शकतो, विशेषतः चेन्नईमध्ये. मला वाटते करुण नायर त्यासाठी योग्य आहे. मी मनीष पांडेला चेन्नईत फारसे फिरकी खेळताना पाहिलेले नाही, पण करुण नायरने चेन्नईत खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात त्रिशतक केले आहे हे लक्षात ठेवा," असेही अश्विन म्हणाला.
अश्विनला सनरायझर्स हैदराबाद ही एक फ्रँचायझी आहे ज्याला नायरमध्ये रस आहे असे वाटते."तो SRHमध्येही जाऊ शकतो, तिथे नक्कीच स्पर्धा असेल त्यामुळे त्याला वाजवी किंमत मिळू शकेल. त्याने अलीकडे काउंटी क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी केली आहे. गेल्या काही वर्षांत त्याला कठीण काळ गेला आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये तिहेरी शतक झळकावलं आणि अचानक तुम्हाला कुठेही सापडत नाही. त्याने मानसिक कणखरता दाखवून पुनरागमन केले आहे आणि म्हणून करुणला सलाम. त्याने केपीएलमध्येही चांगली कामगिरी केली,'' असेही अश्विनने ठामपणे सांगितले.