वेलिंग्टन - न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज रॉस टेलरनेआंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटरवर एक पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे. बांगलादेशविरुद्ध होणारी दोन कसोटी सामन्यांची मालिका आणि त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड्सविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणार असल्याची घोषणा रॉस टेलरने केली आहे.
रॉस टेलरने दीर्घकाळ न्यूझीलंडच्या संघाचं प्रतिनिधित्व करताना आपल्या धडाकेबाज फलंदाजीची छाप पाडली होती. त्याने ११० कसोटी सामन्यांमध्ये ७ हजार ५८४ तर २३३ एकदिवसीय सामन्यांमध्ये ८ हजार ५८१ धावा फटकावल्या आहेत. रॉस टेलरने कसोटीमध्ये १९ शतके आणि ३५ अर्धशतके तसेच एकदिवसीय क्रिकेटमध्ये २१ शतके आणि ५१ अर्धशतके फटकावली आहेत. त्याबरोबरच १०२ टी-२० सामन्यांमध्ये न्यूझीलंडचं प्रतिनिधित्व करताना १९०९ धावा फटकावल्या आहेत.
निवृत्तीबाबत घोषणा करताना रॉस टेलरने सांगितले की, बांगलादेशविरुद्ध होणारे दोन कसोटी सामने, ऑस्ट्रेलिया, नेदरलँड्सविरुद्ध होणाऱ्या सहा एकदिवसीय सामन्यांनंतर मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारणार आहे. १७ वर्षांच्या सुंदर क्रिकेट कारकीर्दीसाठी तुमचे आभार. आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करणं ही सन्माननीय बाब आहे.