न्यूझीलंड संघाला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या साखळी गटातच गाशा गुंडाळावा लागला. क गटात न्यूझीलंडला पहिल्या दोन सामन्यांत अफगाणिस्तान व वेस्ट इंडिजकडून हार पत्करावी लागली आणि त्यांचे सुपर ८ खेळण्याचे स्वप्न भंगले. या स्पर्धेनंतर अनुभवी वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने ( Trent Boult ) हा त्याचा शेवटचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप असल्याचे जाहीर केले.
२०११ मध्ये पदार्पण केल्यापासून ट्रेंट बोल्ट हा किवी संघाचा प्रमुख गोलंदाज बनला आहे. त्याने न्यूझीलंडसाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये अनेक फायनलमध्ये भाग घेतला आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज २०१४ पासून चार ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळला आहे. "माझ्या वतीने सांगायचे तर, हा माझा शेवटचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप असेल. मला एवढेच सांगायचे आहे," असे बोल्ट पत्रकार परिषदेत म्हणाला. न्यूझीलंडने युगांडावर ९ विकेट्स राखून विजय मिळवल्यानंतर त्याने हे जाहीर केले.
पापुआ न्यू गिनी विरुद्ध न्यूझीलंडचा शेवटचा साखळी सामना हा ३४ वर्षीय बोल्टचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमधील शेवटचा सामना असेल. "आम्हाला स्पर्धेत हवी असलेली सुरुवात करता आली नाही. ही निराशाजनक कामगिरी पचवणे अवघड आहे. पुढील फेरीत जाता न आल्याने आम्ही निराश आहोत. पण जेव्हा तुम्हाला देशाचे प्रतिनिधित्व करायला मिळेल तेव्हा हा अभिमानाचा क्षण असतो," असे तो म्हणाला. न्यूझीलंडने २०१४ पासून आयसीसीच्या प्रत्येक प्रमुख स्पर्धेत किमान उपांत्य फेरीपर्यंत मजल मारून सातत्य दाखवले होते.
"ड्रेसिंग रूममध्ये आणि देशासाठी खेळताना खूप अभिमान आहे, आम्ही अनेक वर्षांमध्ये काही उत्कृष्ट रेकॉर्ड्स केले आहेत. हे दुर्दैवी आहे, परंतु त्या ड्रेसिंग रूममध्ये अजूनही काही जबरदस्त प्रतिभा आहे आणि न्यूझीलंड क्रिकेटमध्ये ते स्थान मिळवत आहेत, त्यामुळे आम्ही एक अभिमानास्पद राष्ट्र आहोत आणि आम्ही त्या मार्गाने पुढे जात राहू," असे तो म्हणाला.
गोलंदाज टीम साऊदी ( Tim Southee ) याच्यावर आयसीसीने कारवाई केली.
साऊदीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात नियमाचे उल्लंघन केल्यामुळे अडचणीत आला. त्याने खेळाडूंसाठी आयसीसी आचारसंहितेचा लेव्हल १ गुन्हा मोडला. त्रिनिदाद येथील ब्रायन लारा क्रिकेट अकादमीमध्ये बुधवारी हा प्रकार घडला. खेळाडू आणि खेळाडू सहाय्य कर्मचाऱ्यांसाठीच्या ICC आचारसंहितेच्या अनुच्छेद २.२ चे ( ज्याचा अर्थ "आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान क्रिकेट उपकरणे किंवा कपडे, मैदानी उपकरणे किंवा फिक्स्चर आणि फिटिंगचा गैरवापर" आहे. ) उल्लंघन केल्याबद्दल साऊदी दोषी आढळला.