India vs South Africa Test Series (Marathi News) : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला २६ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेनंतर दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फलंदाज डीन एल्गर ( Dean Elgar retire ) निवृत्त होणार आहे. ३६ वर्षीय फलंदाजाने क्रिकेट दक्षिण आफ्रिकेला त्याचा निर्णय कळवला आहे. १२ वर्षाच्या क्रिकेट कारकीर्दित एल्गरने ८० कसोटी सामन्यांत ५ हजाराहून अधिक धावा केल्या आहेत आणि १७ सामन्यांत त्याने संघाचे नेतृत्वही सांभाळले आहे.
''असं म्हणतात ना, चांगल्या गोष्टीचाही शेवट असतो आणि भारताविरुद्धची कसोटी मालिका ही माझी शेवटची असेल. मी या सुंदर खेळातून निवृत्त होण्याचा निर्णय घेत आहे. या खेळाने मला भरपूर काही दिले. केप टाऊन कसोटी ही माझी शेवटची असेल. जगातील हा माझा सर्वात आवडता स्टेडियम आहे. याच खेळपट्टीवर मी कसोटीतील पहिले शतक ( वि. न्यूझीलंड) झळकावले आणि आशा करतो की शेवटचेही झळकावेन,''असे एल्गर म्हणाला.त्याने पुढे म्हटले की, क्रिकेट खेळण्याचे स्वप्न मी पाहिले आणि त्यात देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे हे माझे भाग्य... गेली १२ वर्ष मला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देशाची सेवा करायला मिळाली, हे मी पाहिलेल्या स्वप्नापेक्षा मोठी गोष्ट आहे. हा प्रवास अविश्वसनीय होता.
२०१२ मध्ये पर्थ कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा मधल्या फळीतील फलंदाज म्हमून एल्गरच्या कारकीर्दिला सुरुवात झाली आणि त्या कसोटीत तो दोन्ही डावात भोपळ्यावर बाद झाला. त्यानंतर तो संघाबाहेर गेला आणि दोन वर्ष प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ६०च्या सरासरीने धावा करून संघात पुनरागमन केले. न्यूझीलंडविरुद्ध त्याने १०३ धावांची खेळी केली. त्यानंतर तो ग्रॅमी स्मिथसोबत सलामीला खेळू लागला.
त्याने ८४ कसोटीत ३७.२८च्या सरासरीने ५१४६ धावा केल्या आहेत आणि त्यात १३ शतकांचा समावेश आहे. त्याने आफ्रिकेकडून ८ वन डे सामनेही खेळले आहेत.