नवी दिल्ली : टी-२० विश्वचषकातील अपयशानंतर बीसीसीआयने संपूर्ण निवड समिती बरखास्त केली. राष्ट्रीय निवड समितीत कोण असतील, याकडे सर्वांच्याच नजरा लागलेल्या आहेत. बीसीसीआयने मागविलेल्या अर्जांची अंतिम तारीख २८ नोव्हेंबर होती. आता या पदासाठी अर्ज केलेल्यांची नावे समोर येत आहेत. नयन मोंगिया, मनिंदर सिंग, शिवसुंदर दास आणि अजय रात्रा यांनी या पदासाठी अर्ज केले आहेत. बीसीसीआय क्रिकेट सल्लागार समिती या सर्वांची मुलाखत घेईल. नवीन निवड समितीचे पहिले काम २०२३ मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या स्थानिक मालिकेसाठी संघ निवडणे असेल.
दास सध्या पंजाबमध्ये फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम करत आहे. याआधी त्याने राष्ट्रीय क्रिकेट अकादमी आणि भारतीय महिला संघासोबत प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. दासची नियुक्ती झाल्यास, तो ओडिशाचा माजी सहकारी देबाशीष मोहंतीची जागा घेईल..
माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरने अर्ज केला आहे की नाही हे निश्चित होऊ शकले नाही. आगरकरने अर्ज केल्यास ते निवड समितीचे अध्यक्ष होण्याची खात्री असल्याचे अनेकांचे मत आहे.
मुंबईच्या वरिष्ठ संघ निवड समितीचे विद्यमान अध्यक्ष सलील अंकोला, माजी यष्टिरक्षक समीर दिघे आणि माजी फलंदाज विनोद कांबळी यांनी मुंबईतून अर्ज केले आहेत. ५० हून अधिक लोकांनी अर्ज केल्याचे समजते.
उत्तर विभागातून मनिंदर, अतुल वासन, निखिल चोप्रा, अजय रात्रा आणि रितिंदर सिंग सोढी यांनी अर्ज केले आहेत. दास, प्रभंजन मलिक, रश्मी रंजन परिदा, शुभमोय दास आणि सौराशीष लाहिरी यांनी पूर्व विभागातून अर्ज केले आहेत. मध्य प्रदेशातून अमय खुरासिया आणि ज्ञानेंद्र पांडे यांनी अर्ज केले आहेत.
Web Title: Veterans filled applications for National Selection Committee with nayan mongiya
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.