भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) मीडिया हक्कांबाबत एक मोठे अपडेट आले आहे. Viacom18 ने टीम इंडियाचे मीडिया हक्क विकत घेतले आहेत. यामुळे आता टीम इंडियाचे सामने स्पोर्ट्स १८ या चॅनेलवर पाहता येणार आहेत. त्यात JIO Cinema वर डिजिटल स्ट्रीमिंग असेल. BCCIच्या मीडिया हक्कांच्या शर्यतीत सोनी आणि स्टार स्पोर्ट्सही होते. पण Viacom 18 ने या सर्वांना मागे टाकले आहे. आता पुढील ५ वर्ष टीम इंडियाच्या घरच्या मालिकेतील सर्व सामने स्पोर्ट्स 18 वाहिनीवर प्रसारित केले जातील.
BCCI आणि Viacom 18 यांच्यात पाच वर्षांसाठी मीडिया हक्कांबाबत करार झाला आहे. पुढील पाच वर्षांत भारतीय संघ घरच्या मैदानावर ८८ सामने खेळणार आहे. यामध्ये २५ कसोटी, २७ वन डे आणि ३६ ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समावेश आहे. मीडिया हक्कांसाठी टेलिव्हिजनची मूळ किंमत २० कोटी रुपये होती, तर डिजिटल अधिकारांची मूळ किंमत २५ कोटी रुपये होती. त्यामुळे दोन्ही माध्यमांची एकूण मूळ किंमत ४५ कोटी रुपये होती. ज्यामध्ये वायकॉम १८ ने आता स्टार स्पोर्ट्स, सोनी नेटवर्क यांना मागे सोडून मीडिया हक्क मिळवले आहेत. असे मानले जाते की BCCIला दोन्ही मीडिया हक्कांसाठी ५२८० कोटी रुपये हवे होते. ज्यातून त्यांना प्रती सामन्यासाठी ६० कोटी मिळतील.
Cricbuzz ने दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआयला आता प्रती सामना ६७.८ कोटी असे पाच वर्षांत ५,९६६,४ कोटींची डील मिळाली आहे. २०१८-२०२३ या कालावधीत स्टार इंडियाने ६१३०.१० कोटी रुपयांत मीडिया हक्क जिंकले होते. त्यापेक्षा आताची रक्कम कमी वाटत असली तरी तेव्हा १००+ सामने होते आणि आता ८८ सामने आहेत. त्यानुसार पुढील पाच वर्ष बीसीसीआयला प्रतीसामना ६७.७ कोटी मिळतील. डिजिटल हक्क ३१०० कोटींना आणि टेलिव्हिजनचे हक्क २८६० कोटींचा विकले गेले आहेत.
- १९९५ ते १९९९- ESPN ने सुमारे ८८ कोटी रुपये दिले.
- १९९९-२००४- दूरदर्शनने २४० कोटी रुपये दिले.
- २००६-२००९- निंबस स्पोर्ट्सने २४०० कोटी रुपये दिले
- २००९-२०१२- निंबस स्पोर्ट्सने २००० कोटी रुपये दिले
- २०१२-२०१८- स्टार इंडियाने ३८५१ कोटी रुपये दिले
- २०१८-२०२३- स्टार इंडियाने ६१३०.१० कोटी रुपये दिले
Viacom18 कडे पुढील मालिका/टूर्नामेंटचे हक्क आहेत - भारतीय क्रिकेट संघाचे घरचे सामने आणि भारताचे देशांतर्गत क्रिकेट, आयपीएल (डिजिटल), महिला प्रीमियर लीग, ऑलिंपिक २०२४, दक्षिण आफ्रिका होम सामने, T10 लीग, रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज, दक्षिण आफ्रिका टी20 लीग, एनबीए, सीरि ए, ला लीगा लीग1, डायमंड लीग