सुट्टीचा आनंद घेण्यासाठी थायलंड येथे गेला असताना मार्च २०२२ मध्ये शेन वॉर्नचा मृत्यू झाला होता. त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे सांगितले जात असले तरी आता तीन वर्षांनी धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. वॉर्नच्या मृत्यूवेळी जो तपास अधिकारी होता त्याने हा खुलासा केला आहे. शेन वॉर्नच्या मृतदेहाजवळून एक व्हायग्राच्या औषधाची बॉटल गायब करण्याचे आदेश त्याला देण्यात आले होते.
पुरुषांची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी वॉर्न थायलंडला गेला होता. तिथे त्याचा संशयास्पद मृत्यू झाला होता. शेन वॉर्नच्या मृत्यू झालेल्या खोलीतून व्हायग्रा जेलीची एक बॉटल तिथून हटविण्यात आली होती, असे या बड्या पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे.
वॉर्नचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे त्याच्या शवविच्छेदन अहवालात म्हटले होते. परंतू, वॉर्नच्या खोलीत सापडलेल्या कामग्रा या व्हायग्रामुळे आता या अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. वॉर्नच्या मृत्यूबाबत अन्य कोणतीही माहिती समोर येऊ नये म्हणून या अधिकाऱ्याला ही बॉटल हटविण्यास सांगण्यात आल्याचा दावा त्याने केला आहे.
शेन वॉर्नच्या खोलीत कामग्रा सापडल्याने प्रकरण क्लिष्ट बनले होते. हे औषध थायलंडमध्ये सहज उपलब्ध होते. या पोलीस अधिकाऱ्याने आपले नाव न छापण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे. मेल ऑनलाईनला दिलेल्या माहितीत त्याने आपल्याला आपल्या वरिष्ठांकडून आदेश आला होता, म्हणजे त्यांना त्यांच्या वरिष्ठांचा आदेश आला होता, असे सांगितले आहे.
मला वाटते की ऑस्ट्रेलियाचे वरिष्ठ अधिकारी देखील यात सामील होते. त्यांना त्यांच्या राष्ट्रीय हिरोचा अशा प्रकारे मृत्यू व्हावा असे वाटत नव्हते.शेन वॉर्नची प्रतिमा वाचवायची होती. अहवालात फक्त हृदयविकाराचा उल्लेख होता, तर कामाग्राची बाटली सापडल्याची वस्तुस्थिती लपवण्यात आली होती, असा दावा त्याने केला आहे.