अयाज मेमन
इंग्लंडमध्ये भारतीय फलंदाजांचे अपयश नवी गोष्ट नाही. सध्याच्या दौऱ्यात फलंदाजांचा संघर्ष चाहत्यांसाठी निराशा वाढविणारा आणि अस्वस्थ करणारा आहे. इंग्लंडमध्ये फलंदाजीत यशस्वी ठरणे भारतासाठी ऐतिहासिकदृष्ट्या मोठे आव्हान राहिले आहे. १९३२ ला सी. के. नायडू यांच्या नेतृत्वात पहिली मालिका खेळल्यापासून भारताने केवळ १९७१, १९८६ आणि २००७ अशा तीनच मालिका जिंकल्या. तथापि त्या त्यावेळी खेळलेल्या संघांना विजयासाठी मार्ग काढण्यात अपयशच आले.
अनेकदा मानसिकदृष्ट्या तोडगा शोधल्यानंतरही इंग्लंडला इंग्लंडमध्ये नमवणे हे भारतीय संघासाठी अवघड असे कोडे ठरले. पहिल्या आणि दुसऱ्या मालिका विजयाला अनेक वर्ष लागली. कसोटीचा दर्जा मिळाल्यापासून गेल्या ९० वर्षांत अनेक चांगल्या खेळाडूंचा भरणा राहिलेल्या भारतीय संघांना फलंदाजीतील अपयशामुळे इंग्लंडमध्ये सकारात्मक निकाल मिळविणे दुर्मिळ होत गेले.२००७ ला राहुल द्रविडच्या नेतृत्वात अखेरचा मालिका विजय मिळाला. मात्र २०११ च्या विश्वविजयानंतर गंभीर, सेहवाग,द्रविड, लक्ष्मण, तेंडुलकर,युवराज आणि धोनी असे दिग्गज असताना मालिका जिंकता आली नव्हती. २०१४ ला धोनीच्या नेतृत्वात १-३ ने, आणि २०१८ ला कोहलीच्या नेतृत्वात १-४ ने पराभवाचे तोंड पहावे लागले. २०१८ ला गोलंदाजांनी स्वत:चे काम चोखपणे बजावल्यानंतरही फलंदाजांना संधीचा लाभ घेता आला नव्हता.हे लिहिताना मी इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय फलंदाजांची बाजू घेणार नाही. खरेतर आतापर्यंतची कामगिरी फारच निराशादायी आहे. संघातील अनुभवी खेळाडूंना डोळ्यापुढे ठेवून मधल्या फळीने अपेक्षाभंग केला, असे म्हणावे लागेल. कोहली आणि ईशांत यांचा हा चौथा इंग्लंड दौरा. रोहित, पुजारा, रहाणे, शमी, जडेजा हे तिसऱ्यांदा तर बुमराह आणि राहुल दुसऱ्यांदा येथे खेळत आहेत. अनुभवातून शिकावे लागेल,हे लक्षात असू द्या. बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर आणि स्टुअर्ट ब्रॉड हे यजमान संघात नसताना भारताने लाभ घ्यायलाच हवा.गेल्या मोसमात ऑस्ट्रेलियाविरुद्ध सनसनाटी मालिका जिंकल्यानंतर, भारत यावेळी इंग्लंडमध्ये जिंकेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. पण तसे घडले नाही. तुलनेत दुबळा इंग्लंड संघ भारताला त्रास देत आहे. मालिकेचा निकाल अद्यापही खुला आहे. पाचव्या सामन्यापर्यंत तो ताणला जाईल. तथापि भारत पराभूत झाल्यास तो मोठा धक्का असेल.
इंग्लंडमध्ये फलंदाजी सोपी आहे का?
इंग्लंडच्या हवामानात वेगवान गोलंदाजांना उत्कृष्ट स्विंग मिळतो. चेंडू हवेत हालचाल करतो. असे चेंडू खेळायला उच्च दर्जाचे तंत्र लागते. तांत्रिकदृष्ट्या सक्षम नसलेले फलंदाज मात्र हमखास बाद होतात. मैदान हिरवेगार असल्यामुळे चेंडूची चमक कायम असते. यामुळे धोका कायम असतो. याशिवाय लहरी हवामान देखील फलंदाजांच्या अडचणी वाढविते. एका क्षणी निरभ्र आणि भरपूर सूर्यप्रकाश असलेले आकाश काही वेळेत ढगाळ होते. पाऊसही कोसळतो. यामुळे परिस्थितीनुसार तंत्र बदलणे भाग पडते. इंग्लिश गोलंदाज वर्षानुवर्षे अशा वातावरणात खेळत असल्याने विविध मैदाने आणि खेळपट्ट्यांवर कसे चेंडू टाकायचे याची त्यांना सवय झाली. दुसरीकडे डॉन ब्रॅडमन, गॅरी सोबर्स, हनिफ मोहम्मद, सुनील गावसकर, विव्हियन रिचर्ड, बॉर्डर, तेंडुलकर, अझहर, लारा, पॉंटिंग, द्रविड या मोजक्या दिग्गजांनी स्वत:च्या शैलीत सुधार करून हवामानाशी एकरूप होत आक्रमकता आणि बचावाच्या बळावर इंग्लंडमध्ये यश मिळविले हे देखील सत्य आहे.