Join us  

पहिल्या सामन्यातील विजय अत्यंत महत्त्वाचा

भारताने पहिला कसोटी सामना ३०४ धावांच्या भल्यामोठ्या फरकाने जिंकला. यामुळे दिसून आले की, भारतीय संघ किती मजबूत आहे. तसेच दुसरीकडे श्रीलंका सध्या किती कमजोर संघ झाला आहे, हेही दिसून आले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 1:07 AM

Open in App

भारताने पहिला कसोटी सामना ३०४ धावांच्या भल्यामोठ्या फरकाने जिंकला. यामुळे दिसून आले की, भारतीय संघ किती मजबूत आहे. तसेच दुसरीकडे श्रीलंका सध्या किती कमजोर संघ झाला आहे, हेही दिसून आले. कर्णधार दिनेश चंदिमल दुखापतग्रस्त झाल्यानंतर ज्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या, तो रंगना हेराथ अपयशी ठरला. गेल्या वेळी गाले येथे झालेल्या कसोटीत लंका विजयी ठरले होते. त्यानंतर मात्र भारताने चांगला खेळ करून मालिका जिंकली होती. एकूणच लंकेच्या खेळामध्ये सातत्याचा अभाव दिसून आला होता.पहिल्या कसोटीमध्ये नुवान प्रदीपचा अपवाद वगळता लंकेच्या इतर गोलंदाजांना आपली छाप पाडण्यात यश आले नाही. त्यामुळे सलग चार कसोटी मालिकांमध्ये विजयी कामगिरी केलेल्या बलाढ्य भारतीय संघाला नमवणे सोपे काम नव्हते. तसेच, श्रीलंकेला श्रीलंकेत हरवणे कधीच सोपे नसते. त्यामुळेच पहिल्या सामन्यातील विजय मला खूप महत्त्वपूर्ण वाटतो आहे. वेगवान गोलंदाजांच्या कामगिरीबाबत म्हणायचे झाल्यास उमेश यादव, मोहम्मद शमी यांना बळी मिळाले. खास करून शमीने चांगला मारा केला. तसेच फिरकीपटूंनीही चांगली कामगिरी केली. रविचंद्रन आश्विन, रवींद्र जडेजा यांनी नेहमीप्रमाणे छाप पाडली. दुसºया डावात या जोडीने बळी घेतलेच, पण जडेजाने पहिल्या डावातही लंकेला गुंडाळण्यात मोलाचे योगदान दिले. यावरून संघाचा समतोल लक्षात येतो. शिवाय हार्दिक पांड्याला खेळविण्यात आले, ही एक रोमांचक निवड होती. कारण बहुतेकांना वाटले होते की, कुलदीप किंवा भुवनेश्वरला खेळविण्यात येईल. पण कोहलीने पांड्याला संधी दिली आणि पांड्याने अर्धशतकही झळकावले.कोहलीच्या मते भविष्यात पांड्या बेन स्टोक्ससारखा महत्त्वपूर्ण खेळाडू बनेल. नक्कीच त्याच्याबाबत खूप मोठे भाकीत केले आहे. पण हा युवा खूप गुणवान असून तो यापुढेही असाच खेळत राहिला, तर खूप काही तो करू शकतो. फलंदाजांबद्दल म्हणायचे झाल्यास, शिखर धवनने शतक, अभिनव मुकुंदने अर्धशतक, चेतेश्वर पुजाराने शतक, विराट कोहलीने शतक झळकावले यावरून भारताच्या फलंदाजीची मजबूत कळून येते. भारताची फलंदाजी पहिल्यापासूनच मजबूत मानली जाते. पण या मजबुतीला जेव्हा गोलंदाजांची उपयुक्त साथ मिळते, तेव्हा टीम इंडियाला रोखणे अत्यंत कठीण बनते आणि सध्या याच आव्हानाला यजमान श्रीलंका सामोरे जात आहेत.