Join us  

विजयी चौकारानंतर पराभवाची हॅट्ट्रिक

महिला क्रिकेट : फलंदाजांच्या अपयशामुळे महाराष्ट्राची दिल्लीविरुद्ध हार; कर्णधार देविकाची अष्टपैलू झुंज अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 12:53 AM

Open in App

पुणे : गोलंदाजांनी शानदार कामगिरी करून दिल्लीला १५५ धावांत गुंडाळल्यानंतरही फलंदाज अपयशी ठरल्याने २३ वर्षांखालील महिलांच्या एकदिवसीय क्रिकेट लीगमध्ये शनिवारी महाराष्ट्राला १३ धावांनी हार पत्करावी लागली. या स्पर्धेत सलग ४ विजय मिळविल्यानंतर महाराष्ट्राचा हा सलग तिसरा पराभव ठरला.

नागपूरमधील विदर्भ क्रिकेट संघटनेच्या (व्हीसीए) मैदानावर ही लढत झाली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्लीला महाराष्ट्राने ४९.१ षटकांत सर्व बाद १५५ धावांवर रोखले. कर्णधार प्रिया पूनियाचा (४१) अपवाद वगळता दिल्लीच्या उर्वरित फलंदाजांना विशीही गाठता आली नाही. महाराष्ट्राची कर्णधार देविका वैद्यने ३६ धावांत सर्वाधिक ४ बळी घेतले. तेजल हसबनीस आणि उत्कर्षा पवार यांनी प्रत्येकी २ बळी घेत तिला चांगली साथ दिली. प्रत्युत्तरात, कर्णधार देविकाने गोलंदाजीप्रमाणेच फलंदाजीतही चमक दाखविताना महाराष्ट्रातर्फे सर्वाधिक ४५ धावा केल्या. तिच्यासह सायली लोणकरच्या ३० धावांचा अपवाद वगळता इतर मुख्य फलंदाज अपयशी ठरल्याने महाराष्ट्राच्या पदरी पराभव आला. हा संघ ४४ षटकांत १४२ धावांवर बाद झाला.

विजयासाठी १५६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना महाराष्ट्राचा प्रारंभ वाईट झाला. सलामी फलंदाजांच्या अपयशाची मालिका या सामन्यामतही कायम राहिली. आठव्या षटकातच महाराष्ट्राने ४ फलंदाज २० धावांत गमावल्या होत्या. यात आणखी २२ धावांची भर पडत नाही तोच अष्टपैलू तेजल हसबनीसदेखील (२१ चेंडूंत १ धाव) माघारी परतली. मात्र, देविकाने एक बाजू लावून धरली होती. तिने चार्मी गवईसह (६) सहाव्या विकेटसाठी ३०, तसेच सायली लोणकरसह (४१ चेंडूंत ५ चौकारासह ३० धावा) सातव्या विकेटसाठी ३२ धावांची भागीदारी केली.

देविका (५२ चेंडूंत ४५ धावा, १ षटकार, ५ चौकार) बाद झाल्यानंतर सायलीने किल्ला लढविण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुसऱ्या बाजूने दिली साथ मिळाली नाही. नवव्या फलंदाजाच्या रूपात ती बाद झाली तेव्हा महाराष्ट्राच्या ११४ धावा झाल्या होत्या. त्यानंतर मात्र, उत्कर्षा पवार (२९ चेंडूंत नाबाद १२, १ चौकार) आणि शिवानी बुकटे (३२ चेंडूंत १५ धावा, ३ चौकार) यांनी शानदार प्रतिकार करीत दिल्लीच्या तोंडचे पाणी पळविले होते. या दोघींनी दिल्लीच्या गोलंदाजांचा समर्थपणे सामना करीत विजयाकडे कूच केले. मात्र, नेहा चिल्लरने शिवानीला बाद करीत दिल्लीला विजय मिळवून दिला. उत्कर्षा-शिवानी जोडीने जिगरबाज झुंज देत अखेरच्या विकेटसाठी केलेली २८ धावांची भागीदारी विजयासाठी १३ धावांनी अपुरी पडली.संक्षिप्त धावफलकदिल्ली : ४९.१ षटकांत सर्व बाद १५५ (प्रिया पूनिया ४१, सिमरन बहादूर १९,लक्ष्मी यादव १८, देविका वैद्य ४/३६, तेजल हसबनीस २/१५, उत्कर्षा पवार २/०, अदिती गायकवाड १/३७) वि. वि. महाराष्ट्र : ४४ षटकांत सर्व बाद १४२ (देविका वैद्य ४५, सायली लोणकर ३०, मधू ३/१५, आयुष सोनी २/२२, सिमरन बहादमर २/३५, नेहा चिल्लर १/२६).महाराष्ट्राची ७ सामन्यांतील कामगिरीप्रतिस्पर्धी संघ निकाल

आंध्र प्रदेश महाराष्ट्र ३ विकेटने विजयीहैदराबाद महाराष्ट्र ६६ धावांनी विजयीविदर्भ महाराष्ट्र ३ विकेटने विजयीत्रिपुरा महाराष्ट्र १५८ धावांनी विजयीमुंबई महाराष्ट्र ७९ धावांनी पराभूतहिमाचल प्रदेश महाराष्ट्र ८ विकेटने पराभूतदिल्ली महाराष्ट्र १३ धावांनी पराभूत

टॅग्स :पुणेमहाराष्ट्र