सलग सातव्यांदा आशिया चषक जिंकल्याबद्दल भारतीय संघाचे अभिनंदन. या विजयासाठी अनेक अडथळ्यांचे दिव्य पार करीत भारतीय संघाने चाहत्यांना श्वास रोखून धरायला लावला होता. त्यासाठी बांगलादेशाचीही पाठ थोपटायला हवी. अंतिम सामन्यात मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरलेल्या या संघाने कमी धावसंख्येचाही चांगला बचाव केला. संघर्ष करीत भारताच्या तोंडचे पाणी पळविल्याबद्दल प्रतिस्पर्धी खेळाडू प्रशंसेस पात्र ठरतात.
भारताचा विजय निर्विवाद नव्हताच. गेल्या १८ महिन्यांत रोहित शर्मा, शिखर धवन आणि विराट कोहली हे आघाडीचे तीन फलंदाज मोठ्या प्रमाणावर धावा काढत आहेत. वन-डे क्रिकेटमध्ये हे आवश्यकही आहेच. यापैकी एकतरी फलंदाज मोठी खेळी करीत वेळोवेळी संघाला सावरतो. पण निर्णायक क्षणी मधल्या फळीवर विजयाची जबाबदारी आली, की फलंदाजी डळमळीत होते. शुक्रवारच्या रात्री असेच चित्र होते. टप्प्याटप्प्याने गडी बाद होत गेले आणि हुरहूर वाढतच गेली. रोहित खेळपट्टीवर असेपर्यंत बांगलादेशवर आणखी एक सोपा विजय नोंदवू, असे वाटत होते. रोहित बाद होताच बांगलादेशच्या खेळाडूंची देहबोली बदलल्याचे लक्षात आले. मशर्रफ मूर्तझाने वेळोवेळी गोलंदाजी बदलण्याचे डावपेच अवलंबले. रोहितने ज्यांचा मारा फोडून काढला त्या रुबल हुसेन, मुस्तफिजूर रहमान आणि स्वत: मूर्तझा यांनी टिच्चून मारा केला. अगदी यष्टीवर येणाऱ्या चेंडूवर धावा काढणे दिनेश कार्तिक आणि धोनीला कठीण गेले. अनुभवी जोडीला ‘स्ट्राईक रोटेट’ करता येत नव्हता. आवश्यक धावा आणि चेंडू यांचे समीकरण सारखे येताच, भारतीय संघाच्या हृदयाचे ठोके चुकल्यासारखे होत होते. लक्ष्य थोड्या फरकावर असताना दोघेही अनुभवी फलंदाज बाद झाले. केदारच्या स्नायूच्या दुखण्यामुळे धोनीचे चेंडूवरील लक्ष कदाचित विचलित झाले असावे. सुदैवाने जडेजा-भुवनेश्वर यांनी शांतचित्ताने खेळून भारताला तारले. केदारनेही शेवटी विजयाचा कळस चढविला. रोहित बाद झाल्यानंतरही २०० चेंडूंत विजयासाठी १४० धावांची गरज होती आणि सात गडी शिल्लक होते. पण सामना अखेरच्या चेंडूपर्यंत रंगतदार होईल, असे कुणाच्या ध्यानीमनीही नसावे. लिट्टन दासच्या शतकानंतरही बांगलादेशने परिस्थितीचा लाभ घेतला नाही. त्याच्या पहिल्या शतकाच्या बळावर किमान २६० धावा होतील, अशी अपेक्षा बाळगली होती. पण दडपणातही नेतृत्व करण्याची रोहितची शैली प्रभावशाली वाटली. बांगलादेशच्या मधल्या फळीला खिंडार पाडण्यासाठी रोहितने चाणाक्षपणे गोलंदाजीत वारंवार बदल केले. मोठी सलामी केल्यानंतरही १० गडी १०२ धावांत गमाविणाºया बांगलादेशकडून सामन्याची सूत्रे भारताकडे आली होती, हेच खरे.