- रोहित नाईक
मुंबई : अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा ५ विकेट्सने पराभव करुन टी२० सामन्यांच्या मालिकेत ३-० असा क्लीनस्वीप नोंदवला. विशेष म्हणजे यासह यजमानांनी पहिल्यांदाच मुंबईमध्ये टी२० सामना जिंकण्याची कामगिरीही केली. लंकेने दिलेल्या १३६ धावांचे आव्हान भारताने ४ चेंडू राखून पार पाडले. भारताने मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतलेली असल्याने वानखेडे स्टेडियमवरील हा सामना अपौचारीकतेचा ठरला होता. मात्र, याआधी वानखेडेवर झालेल्या दोन्ही टी२० सामन्यात भारताला इंग्लंड व वेस्ट इंडिजविरुद्ध पराभूत व्हावे लागले होते. परंतु, मुंबईकर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना भारताने येथे पहिला विजय मिळवण्यात यश मिळवले.
धावांचा पाठलाग करताना भारताने सावध सुरुवात केली. लोकेश राहुल (४) स्वस्तात परतल्यानंतर रोहित - श्रेयस अय्यर या मुंबईकर जोडीने भारताला सावरले. परंतु, आक्रमक फटका मारण्याच्या नादात रोहित (२७) झेलबाद झाला. यानंतर अय्यर - मनिष पांडे यांनी ४२ धावांची भागीदारी करुन पडझड रोखली. परंतु, ठराविक अंतराने बळी घेत लंकेन भारतावर दडपण आणले. एकवेळ १६.१ षटकात भारताची ५ बाद १०८ धावा अशी अवस्था झाली होती. परंतु, दिनेश कार्तिक - महेंद्रसिंग धोनी या जोडीने भारताला विजयी केले. अय्यरने ३२ चेंडूत ३०, तर मनिषने २९ चेंडूत ३२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. कार्तिकने १२ चेंडूत नाबाद १८ आणि धोनीने १० चेंडूत नाबाद १६ धावा करत भारताला विजयी केले. दुष्मंता चमीरा व दासुन शनाका यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.
त्यापूर्वी, प्रथम फलंदाजी करताना भारतीय गोलंदाजांसमोर लंकेजी फलंदाजी सपशेल अपयशी ठरली. भारतीय गोलंदाजांनी केलेल्या अचूक मा-यापुढे पुन्हा एकदा ढेपाळलेल्या श्रीलंकेने तिसºया आणि अखेरच्या टी२० सामन्यात निर्धारीत २० षटकात ७ बाद १३५ धावांची मजल मारली. जयदेव उनाडकट आणि हार्दिक पांड्या यांनी अप्रतिम मारा करताना श्रीलंका फलंदाजांची कोंडी केली. आता भारताने विजय मिळवण्यास यश मिळवले, तर भारताचा हा मुंबईमध्ये पहिला आंतरराष्ट्रीय टी२० विजय ठरेल.
वानखेडे स्टेडियमवर नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार रोहित शर्माने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. सध्या संघाचा सुरु असलेला तुफान फॉर्म पाहता भारत पहिले फलंदाजी घेईल अशी अपेक्षा होती. परंतु, घरचे मैदान चांगल्या प्रकारे ओळखून असलेल्या रोहितने आपला निर्णय योग्य ठरवला. गोलंदाजांनी कर्णधाराच्या निर्णयाचा योग्य सन्मान करताना नियंत्रित मारा करत श्रीलंकेची कोंडी केली. श्रीलंकेची आघाडी फळी आक्रमक फटके मारण्याच्या प्रयत्नात लागोपाठ बाद झाल्याने त्यांचा अर्धा संघ ११.४ षटकात केवळ ७२ धावांत परतला होता. यामुळे इतर खेळाडूंवर कमालीचे दडपण आले.
जयदेव उनाडकटने आपल्या पहिल्याच षटकात बळी घेत श्रीलंकेच्या फलंदाजीला सुरुंग लावला. यानंतर सर्वात युवा भारतीय म्हणून पदार्पण केलेल्या वॉशिंग्टननेही ‘सुंदर’ मारा करत आंतरराष्ट्रीय टी२० मधील पहिला बळी मिळवला. पहिल्या ६ षटकांमध्येच श्रीलंकेची ३ बाद ३७ अशी अवस्था करुन यजमानांनी सामन्यावर मजबूत पकड मिळवली. श्रीलंकेने आपले अर्धशतक ४५ चेंडूंमध्ये पूर्ण केले.
निरोशन डिकवेला (१), उपुल थरंगा (११), कुशल परेरा (४), सदीरा समरविक्रमा (२१), दानुष्का गुणथिलका (३) आणि कर्णधार थिसारा परेरा (११) असे सर्वच प्रमुख फलंदाज झटपट परतल्याने श्रीलंकेची बिकट अवस्था झाली होती. केवळ असेला गुणरत्ने याने एकाकी झुंज देताना ३७ चेंडूत ३ चौकारांसह ३६ धावांची झुंजार खेळी केली. अखेरच्या क्षणी दासुन शनाका (२९*) याने दोन षटकारांसह फटकेबाजी केल्याने श्रीलंकेला समाधानकारक धावसंख्या गाठण्यात यश आले.
त्याचवेळी, भारताच्या प्रत्येक गोलंदाजाने अप्रतिम मारा करताना बळी घेण्यात यश मिळवले. उनाडकटने १५ धावांच्या मोबदल्यात २, तर हार्दिकने २५ धावांत २ बळी घेतले.
धावफलक : श्रीलंका : निरोशन डिकवेला झे. सिराज गो. उनाडकट १; उपुल थरंगा झे. हार्दिक गो. उनाडकट ११, कुशल परेरा झे. व गो. सुंदर ४, सदीरा समरविक्रमा झे. कार्तिक गो. हार्दिक २१, असेला गुणरत्ने ३६, दानुष्का गुणथिलका झे. हार्दिक गो. कुलदीप ३, थिसारा परेरा झे. रोहित गो. सिराज ११, दानुष्का शनाका नाबद २९, अकिला धनंजय नाबाद ११. अवांतर - ८. एकूण : २० षटकात ७ बाद १३५ धावा.
गोलंदाजी : वॉशिंग्टन सुंदर ४-०-२२-१; जयदेव उनाडकट ४-०-१५-२; मोहम्मद सिराज ४-०-४५-१; हार्दिक पांड्या ४-०-२५-२; कुलदीप यादव ४-०-२६-१.
भारत : रोहित शर्मा झे. कुशल गो. शनाका २७, लोकेश राहुल पायचीत गो. चमीरा ४, श्रेयस अय्यर धावबाद (धनंजय) ३०, मनिष पांडे त्रि. गो. दुष्मंता चमीरा ३२, हार्दिक पांड्या झे. डिकवेला गो. शनाका ४, दिनेश कार्तिक नाबाद १८, महेंद्रसिंग धोनी नाबाद १६. अवांतर - ८. एकूण : १९.२ षटकात ५ बाद १३९ धावा.
गोलंदाजी : अकिला धनंजय ४-०-२७-०; दुष्मंता चमीरा ४-०-२२-२; थिसारा परेरा ३.२-०-२२-०; नुवान प्रदीप ४-०-३६-०; दानुष्का शनाका ४-०-२७-२.
वॉशिंग्टनचे ‘सुंदर’ पदार्पण...
वॉशिंग्टन सुंदर (वय १८) आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात पदार्पण करणारा सर्वात युवा भारतीय खेळाडू ठरला. याआधी दिल्लीचा रिषभ पंत याने वयाच्या १९व्या वर्षी इंग्लंडविरुद्ध टी२० पदार्पण करत सर्वात युवा खेळाडू होण्याचा मान मिळवला होता. हाँगकाँगच्या वकास खान याच्या नावावर सर्वात कमी वयात आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात पदार्पण करण्याचा विक्रम असून त्याने वयाच्या १५व्या वर्षी नेपाळविरुद्ध कोलोंबो येथे पदार्पण केले होते.