Team India Mumbai Airport : मरीन ड्राईव्ह परिसरात मोठी गर्दी झाल्याने पोलिसांसह टीम इंडियाला घेऊन जाणाऱ्या वाहनाच्या वाटेत व्यत्यय येत आहे. आपल्या विश्वविजेत्या संघाची एक झलक पाहण्यासाठी मुंबईकर मोठ्या संख्येने एकवटले. टीम इंडियाने वेस्ट इंडिजच्या धरतीवर ऐतिहासिक कामगिरी केली. बार्बाडोस येथे दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून भारतीय संघाने विश्वचषक उंचावला. ट्वेंटी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ मायदेशात परत आला आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन गुरुवारी सकाळी नवी दिल्लीत पोहोचले. भारत १३ वर्षांनंतर विश्वविजेता बनला आहे. टीम इंडियाची मुंबईत विजयी परेड होत आहे. याआधी भारतीय संघाने दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. आयपीएल २०२४ मध्ये चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागलेल्या हार्दिक पांड्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. वानखेडे स्टेडियमवर चाहते 'हार्दिक हार्दिक' अशा घोषणा देताना दिसले. याशिवाय लोकल बॉय असलेल्या रोहित शर्माच्या घोषणांनी स्टेडियम दणाणून निघाले. मरीन ड्राईव्ह परिसरातील तोबा गर्दी पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याशी संवाद साधला.
ते म्हणाले की, आयसीसी ट्वेंटी-२० विश्वचषक विजेता भारतीय क्रिकेट संघाच्या स्वागतासाठी जमलेल्या क्रिकेट प्रेमींच्या गर्दींचे संनियत्रण करण्याचे मुंबई पोलीस आयुक्तांना निर्देश दिले आहेत. विजयवीर संघाच्या स्वागतासाठी वानखेडे स्टेडियम तसेच नरीमन पॉईंट ते स्टेडियम दरम्यान, मरिन ड्राईव्ह या परिसरात मोठी गर्दी झाली आहे. या गर्दीमुळे वाहतुक विस्कळीत होऊ नये तसेच जमलेल्या क्रिकेट प्रेमींचीही गैरसोय होऊ नये याकडे मुंबई पोलीस दल आणि संबंधित यंत्रणांनी लक्ष पुरवावे, अनुषांगिक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना दुरध्वनीद्वारे दिल्या आहेत.
भारताच्या चॅम्पियन संघाला पाहण्यासाठी मरीन ड्राईव्ह परिसरात चाहत्यांनी एकच गर्दी केली. पावसाच्या हलक्या सरी चाहत्यांचा उत्साह वाढवत आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनने आजच्या खास कार्यक्रमासाठी सर्व चाहत्यांना वानखेडे स्टेडियममध्ये मोफत एन्ट्री देण्याचा निर्णय घेतला. पावसाच्या सरी बरसत असल्या तरी चॅम्पियन संघाची झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी क्रिकेटच्या पंढरीत मोठ्या संख्येने हजेरी लावली.