Team India Mumbai Airport : टीम इंडियाने वेस्ट इंडिजच्या धरतीवर ऐतिहासिक कामगिरी केली. बार्बाडोस येथे दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून भारतीय संघाने विश्वचषक उंचावला. ट्वेंटी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ मायदेशात परत आला आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन गुरुवारी सकाळी नवी दिल्लीत पोहोचले. भारत १३ वर्षांनंतर विश्वविजेता बनला आहे. टीम इंडियाची आज सायंकाळी मुंबईत विजयी परेड होणार आहे. याआधी भारतीय संघाने दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. आयपीएल २०२४ मध्ये चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागलेल्या हार्दिक पांड्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. वानखेडे स्टेडियमवर चाहते 'हार्दिक हार्दिक' अशा घोषणा देताना दिसले. याशिवाय लोकल बॉय असलेल्या रोहित शर्माच्या घोषणांनी स्टेडियम दणाणून निघाले.
दरम्यान, भारतीय संघाला घेऊन येणाऱ्या विमानालाविमानतळावर कडक सॅल्युट देण्यात आला. टीम इंडियाला घेऊन येणाऱ्या विमानाला विमानतळावर 'वॉटर सॅल्युट' देण्यात आला. ही अनोखी घटना साऱ्यांचेच लक्ष वेधत आहे.
भारताच्या चॅम्पियन संघाला पाहण्यासाठी मरीन ड्राईव्ह परिसरात चाहत्यांनी एकच गर्दी केली. पावसाच्या हलक्या सरी चाहत्यांचा उत्साह वाढवत आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनने आजच्या खास कार्यक्रमासाठी सर्व चाहत्यांना वानखेडे स्टेडियममध्ये मोफत एन्ट्री देण्याचा निर्णय घेतला. पावसाच्या सरी बरसत असल्या तरी चॅम्पियन संघाची झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी क्रिकेटच्या पंढरीत मोठ्या संख्येने हजेरी लावली.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय संघातील शिलेदारांचा व्हिडीओ समोर आला आहे. मोदी खेळाडूंशी संवाद साधताना दिसत आहेत. मात्र, ट्रॉफीसोबत फोटो काढताना नरेंद्र मोदींनी ट्रॉफी न धरता कर्णधार रोहित शर्मा आणि मावळते प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा हात धरला. मोदींची ही कृती सर्वांचे लक्ष वेधत आहे. टीम इंडियाची आज सायंकाळी मुंबईत विजयी परेड होणार आहे. याआधी भारतीय संघाने दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. भारतीय क्रिकेट संघाने ७, लोककल्याण मार्गावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. २९ जून रोजी बार्बाडोस येथे ट्वेंटी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडिया आज सकाळी दिल्ली विमानतळावर पोहोचली.