लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अक्षय वाडकरच्या नेतृत्वाखालील विदर्भ संघाने घरच्या मैदानावर रणजी करंडकाच्या उपांत्यपूर्व सामन्यात बलाढ्य कर्नाटकचा मंगळवारी १२७ धावांनी पराभव करीत उपांत्य फेरीत धडक दिली. व्हीसीए सिव्हिल लाइन्स स्टेडियमवर हर्ष दुबे-आदित्य सरवटे या फिरकीपटूंनी विदर्भाचा विजय साकारला. ५५ धावांच्या योगदानासह ७ बळी घेणारा डावखुरा फिरकीपटू आदित्य सरवटे सामनावीर ठरला. विदर्भाला आता याच मैदानावर २ मार्चपासून मध्य प्रदेशविरुद्ध उपांत्य सामना खेळायचा आहे.
कर्नाटकने कालच्या १ बाद १३० वरून ३७१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग केला खरा; मात्र पाचव्या दिवशी सकाळपासून त्यांची पडझड सुरू झाली. अखेरच्या दिवशी २६८ धावांचे आव्हान असताना दुबे- सरवटे यांच्या माऱ्यापुढे त्यांच्या नऊ फलंदाजांनी गुडघे टेकले. कर्णधार मयंक अग्रवाल (७०), निकिन जोस (००) आणि मनीष पांडे (१) सरवटेच्या गोलंदाजीत पाठोपाठ बाद झाले. अनीष केव्हीने दुसरे टोक सांभाळले होते; पण तो ४० धावांवर धावबाद होताच कर्नाटकच्या आशेवर पाणी फेरले गेले. हार्दिक राज (१३)सोबत सहाव्या गड्यासाठी ४० धावांची भागीदारी करीत अनीषने डाव सावरण्याचा प्रयत्न केला; पण दुबेने कर्नाटकच्या तळाच्या फळीला खिंडार पाडले. त्याने हार्दिकसह एस. शरथ (६) याला माघारी धाडले. विजय कुमार विशाक (३४) आणि विद्वत कावेरप्पा (२५) यांनी ३३ धावांची भागीदारी करीत पराभव लांबवला. पण, दुबेने अखेरच्या दोन फलंदाजांना बाद करीत विदर्भाला मोठा विजय मिळवून दिला. कर्नाटकचा डाव २४३ धावांत आटोपला.
तिसऱ्यांदा उपांत्य फेरीत२०१७-१८ आणि २०१८-१९चा चॅम्पियन विदर्भाने रणजी करंडकाची तिसऱ्यांदा उपांत्य फेरी गाठली आहे. व्हीसीएचे अध्यक्ष न्या. (सेवानिवृत्त) विनय देशपांडे यांनी
संक्षिप्त धावफलक विदर्भ पहिला डाव : १४३.१ षटकांत सर्वबाद ४६० धावा, कर्नाटक पहिला डाव : ९०.३ षटकांत सर्वबाद २८६ धावा (निकिन जोस ८२, आर. समर्थ ५९). गोलंदाजी : यश ठाकूर ३/४८, आदित्य सरवटे ३/५०, उमेश यादव २/५४, आदित्य ठाकरे १/५१, हर्ष दुबे १/६९. विदर्भ दुसरा डाव : ५७.२ षटकांत सर्वबाद १९६ (ध्रुव शोरे ५७, अथर्व तायडे २५, करुण नायर ३४, आदित्य सरवटे २९, उमेश यादव १०). गोलंदाजी : विद्वत कावेरप्पा ६/६१, विजय कुमार ४/८१. कर्नाटक दुसरा डाव : ६२.४ षटकांत सर्वबाद २४३ (रविकुमार समर्थ ४०, मयंक अग्रवाल ७०, अनीष ४०, विजय वैशाक ३४, विद्वत कावेरप्पा २५) गोलंदाजी : हर्ष दुबे ४/६५, आदित्य सरवटे ४/७८. संघाच्या कामगिरीचे कौतुक केले. ‘विदर्भाला तुमचा अभिमान वाटतो’, अशी प्रतिक्रिया व्यक्त करीत त्यांनी उपांत्य सामन्यासाठी संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.